Police : नगर : नालेगाव येथे लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्थेत स्वस्त दरात प्लॉट मिळवून देण्याच्या आमिषाने गोरगरिबांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुरूवारी (ता. १२) रात्री गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात कैलास नामपेल्ली उषाकोयल यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश भुमय्या कोटा (रा. बालाजी सोसायटी, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) व अशोक बाळू पुंड (रा. साई गजानन कॉलनी, लेखानगर, सावेडी, अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. अशोक पुंड हा जिल्हा पोलीस (Police) दलात कार्यरत आहे.
नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्यांचा सरकारला संतप्त सवाल
पोलिसाकडूनच फसवणूक झाल्याने खळबळ
दरम्यान, अशोक पुंडने गोरगरिबांना गंडा घातल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. फिर्यादी कैलास उषाकोयल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांची प्रकाश कोटा व अशोक पुंड यांच्यासोबत पूर्वीपासून ओळख असून, मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा घेत २०११ साली दोघांनी लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापनेचे आमिष दाखवले. गरिबांसाठी ५०० चौरस फुटांचे प्लॉट कमी किमतीत देण्याचे आश्वासन दिले आणि शासकीय प्रक्रियेअंती प्लॉट मिळतील, असे सांगत विश्वास संपादन केला. उषाकोयल कुटुंबीयांनी ७५ हजार रुपये प्रमाणे कैलास, पत्नी रत्नमाला, मोठा मुलगा सचिन व लहान मुलगा आकाश यांनी एकूण ३ लाख रुपये कोटा व पुंड यांना धनादेश व पावत्या करून दिले. याशिवाय त्यांच्या ओळखीचे लक्ष्मण श्रीगादी यांनी आपल्या चार मुलांच्या नावाने तीन लाख रुपये, तर उषाकोयल यांची बहीण शशिकला मिठापेल्ली हिने १ लाख २५ हजार रुपये रोख स्वरूपात दिले.
अवश्य वाचा : विमानाबाहेरील ‘त्या’ ३३ मृतांच्या कुटुंबियांनाही मिळणार १ कोटी रुपयांची आर्थिक मदत
कोणतीही फाईल किंवा प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे स्पष्ट (Police)
रक्कम घेऊन बराच काळ उलटला तरी कोटा व पुंड यांनी प्लॉटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा केली असता जिल्हाधिकारी परवानगी प्रक्रियेत आहे, प्लॅन मंजूर होतोय अशी कारणे देत वेळ मारून नेण्यात आली. शेवटी सरकारी कार्यालयात चौकशी केली असता कोणतीही फाईल किंवा प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा ही संपूर्ण बाब फसवणुकीची असल्याचे उघड झाले. उषाकोयल यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.