Police Sub-Inspector : नगर : महाराष्ट्र लाेक सेवा आयाेगाच्या (MPSC) परीक्षेत यशाचे शिखर सर करत श्रीगाेंदे (Shrigonda) तालुक्यातील चार शिलेदारांनी महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या यादीत पाेलीस उपनिरीक्षक पदासाठी (Police Sub-Inspector) स्थान मिळवले. महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशा चारही टप्प्यात निखिल निळकंठ बोरुडे (श्रीगोंदे), वर्षा बापू मासाळ (वांगदरी), गौरी माधव धावडे (येळपणे), वैभव जालिंदर वाघमारे (देवदैठण) या शिलेदारांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.
नक्की वाचा: श्रीरामपूर खून प्रकरणात दोन आरोपी १२ तासांत गजाआड
श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावला
गौरी धावडे हिचे आई-वडील शेतकरी आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण येळपणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, खंडेश्वर विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तिने बीए केले. त्यानंतर राज्य सेवा परीक्षा दिली. त्यात यश मिळविले. मामा मुंबईचे अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. निखिल बोरुडे याचे प्राथमिक शिक्षण पारगाव सुद्रिक येथील प्राथमिक शाळेत, तर विद्यालयीन शिक्षण श्रीगोंदे येथील महादजी शिंदे विद्यालयात, अकरावी-बारावी अहमदनगर येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलमध्ये, त्याने पुणे येथील जीएसपीएम महाविद्यालयातून अभियांत्रिकी (मेकॅनिकल) पदवी घेतली. त्यानंतर राज्य सेवेची तयारी करून यश मिळविले. तो शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे यांचा मुलगा आहे.
अवश्य वाचा: मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया
मोठ्या जिद्दीने परीक्षा केली पार (Police Sub-Inspector)
वैभव वाघमारे याचे प्राथमिक शिक्षण देवदैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण येथील विद्याधाम प्रशालेत झाले. त्याने पदवीचे शिक्षण शिरुर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्समध्ये केले. वर्षा मासाळ ही पोलीस उपनिरीक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. शारीरिक चाचणी परीक्षा आठ दिवसांवर आली असता सराव करीत असताना पाय मोडला. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक होण्याचा नाद सोडला आणि घर गाठले. मात्र, शारीरिक चाचणी परीक्षा एक महिना पुढे ढकलली. अशा परिस्थितीत वर्षा पुन्हा उभी राहिली. मोठ्या जिद्दीने शारीरिक चाचणी परीक्षेस सामोरी गेली आणि यश मिळविले. तिचे प्राथमिक शिक्षण मासाळवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेत, तर वांगदरी येथील शिवाजीराव नागवडे विद्यालयात घेतले. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए केले.