Politics : नगर : राज्याच्या राजकारणात (Politics) महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडी (Maha vikas Aghadi) यांंच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. मात्र, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडाचा ध्वज हाती घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही आठ मतदारसंघात बंडाळी झाल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत.
अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार
जिल्ह्यात मित्रपक्षांच्या विरोधात अर्ज दाखल करत बंडखोरी
राज्यात भाजप, शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट अशी महायुती आहे. तर काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट अशी महाविकास आघाडी आहे. जिल्ह्यात मित्रपक्षांच्या विरोधात काही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांना महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. असे असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज ठेवला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे दोन नेते निवडणूक रिंगणात आहेत. या बंडाळीमुळे महाविकास आघाडीला मत विभाजनाचा फटका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
अकोले मतदारसंघात रंगली उलटसुलट चर्चा (Politics)
अकोले विधानसभा मतदारसंघात महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत बंड दिसत आहे. या बंडाचा फटका कोणाला बसणार यावर अकोले मतदारसंघात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
नेवासे मतदारसंघात महायुतीने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. असे असताना भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या विरोधकांत दोन गट पडल्याची चर्चा आहे.
शिर्डी मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा घोगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर विखेंचे पारंपरिक विरोधक असलेल्या राजेंद्र पिपाडा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विखेंविरोधात दोन गट दिसून येत आहेत.
पारनेर मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्याच वेळी माजी आमदार विजय भास्करराव औटी व अजित पवार गटाचेच विजय सदाशिव औटी यांनीही उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या राणी लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनीही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पारनेरमध्ये आघाडी व युती दोन्हींमध्येही बंडाळी पहायला मिळत आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर केली असताना शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चूरस वाढली आहे. यातच भाजपने ऐनवेळी प्रतिभा पाचपुते यांच्या ऐवजी विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे सांगितले जात आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात निवडणूक जाहीर झाल्यापासून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून आली. महायुतीने भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी बंड करत उमेदवारी करण्याचे निश्चित केले आहे.
श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसने आमदार लहू कानडे यांना उमेदवारी न देता हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या कानडे यांनी अजित पवार गटात प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीने या मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीत बंड पहायला मिळत आहे. ही बिघडलेली राजकीय समीकरणे कोणाला फायदेशीर ठरतात व कोणाचा घात करतात. हे आगामी काळ ठरवणार आहे.