Politics : राहुरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP Sharadchandra Pawar) वर्धापनदिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा, अशी प्रदर्शित इच्छा व त्यांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची तेथील अनुपस्थितीची राजकीय (Politics) चर्चा सुरू आहे. अशी चर्चा टिपेला असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राहुरी कारखाना येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या आरोग्य तपासणी शिबिरास व संस्थापक डॉ. दादासाहेब तनपुरेंच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन केले. त्यांच्या प्रवासात १० मिनीटे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे शरद पवार यांच्या वाहनात सहप्रवासी होते.
नक्की वाचा : ‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा
राजकीय चर्चेला उधाण
एकीकडे तनपुरे गट शरद पवार यांची राजकीय साथ सोडण्याची चर्चा जोरात असतानाच प्राजक्त तनपुरे शरद पवार यांचे सहप्रवासी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. नंतर अल्पावधीतच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे पुढील कार्यक्रमाठी रवाना होताना, माध्यमांच्या तावडीतून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दांडी मारली व याची जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात झाली. ही चर्चा सोशल मीडियावर व माध्यमांमध्ये पसरत असतानाच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार श्रीरामपुरला महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी जात असताना राहुरीत थांबले. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना आपल्या वाहनात पुढच्या सीटवर बसवून १० किलोमीटरवर प्रवास केला.
अवश्य वाचा : ‘दिवा विझताना मोठा होतो,तसं जयंत पाटलांचं झालंय’- गोपीचंद पडळकर
तनपुरे राजकीय वाट बदलणार असल्याची जोरदार चर्चा (Politics)
राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम मधील कै. डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास्थळापर्यंत प्रवास केला. डॉ. दादासाहेब तनपुरे यांची पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेला शरद पवार व अन्य नेत्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. खासदार निलेश लंके, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे, तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, डॉ. तनपुरे कारखान्याचे, बाजार समितीचे सर्व संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विवेकानंद नर्सिंग होमचे डॉक्टर्स, पदाधिकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या वाहनातील प्रवासाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तनपुरे गट राजकीय वाट बदलणार असल्याची माध्यमात जोरदार चर्चा सुरू आहे. ते आता राजकीय वाटचालीत सहप्रवासी कोणाचे असणार आहेत, हे स्पष्ट होण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.