Pradhan Mantri Awas Yojana : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) (घरकुल) संदर्भात अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य व लाभार्थ्यांनी गुरुवारी पंचायत समितीच्या (panchayat samiti office) प्रवेशद्वारावर आंदोलन (Movement) केले. प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पाडळी गावातील ‘ड’ यादीत साधारण १४० लाभार्थ्यांचा समावेश आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यापैकी ६० लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे धनादेश ग्रामपंचायत कार्यालयात वितरित करण्यात आले. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत अनियमितता झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
नक्की वाचा : संगमनेर तहसील कार्यालयाबाहेर लाचखोर लिपीक जेरबंद; एसीबीची कारवाई
यादीतून नाव गायब केल्याने संशय
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आठ ते नऊ लाभार्थ्यांची घरे दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली असताना, संगनमत करून त्यांना घरकुल योजनेचे तीन हप्ते काढून देण्यात आले. त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांकडून २० ते २५ हजार रुपये घेण्यात आल्याचा आरोप सरपंच व ग्रामसेवकांवर करण्यात आला आहे. पूर्ण बांधकाम झालेल्या घरांवर योजनेचा लाभ देणे हा नियमबाह्य प्रकार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच, पाडळी येथील कचरु मारुती गर्जे यांचे नाव यादीमध्ये होते. ते नाव ‘ड’ यादीतून वगळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. त्यांच्या खात्यावर १५ हजार रुपयांचा हप्ता जमा झाल्याचे सांगण्यात येते; मात्र त्यानंतर यादीतून नाव गायब केल्याने संशय व्यक्त केला जात आहे. नाव का काढून टाकले, याबाबत लेखी माहिती द्यावी,अशी मागणी करण्यात आली.
अवश्य वाचा : १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन (Pradhan Mantri Awas Yojana)
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य दिलीप कचरे, कचरु गर्जे, कल्पना गर्जे आदींनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार यांनी योजनेचा गैरवापर केल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाची भूमिकाही जाहीर करण्यात आली होती. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.



