Prajakt Tanpure : राहुरी : आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांचे प्रगती पुस्तक तसे चांगले होते. मात्र सन २०१९ मध्ये मतदारसंघात अंडरकरंट होता. तो अंडरकरंट अंतर्गत गटबाजी, वचपा घेण्याचा होता तसाच अडरकरंट या वेळी राज्यस्तरीय प्रचारातील मुद्यांचा होता. स्थानिक पातळीवरील प्रश्नांपेक्षा प्रचारात राज्य स्तरीय पातळीवर महायुतीची व्युहरचना भारी ठरली. मी आधुनिक काळातील अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो असे भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले होते, आणि ते प्रत्यक्षात करुन दाखविले. त्यामुळे मतदारसंघात महाविकास आघाडीची व्यूहरचना अपयशी ठरली. परिणामी सुरक्षित वाटणारी निवडणूक आमदार प्राजक्त तनपुरे यांचा ३४ हजार मताधिक्याने पराभव करणारी ठरली. त्यांनी अनके विकास कामे केली. प्रचार यत्रंंणा प्रभावीपणे राबवूनही, मतदारांशी दांडगा संपर्क ठेवूनही, अनेक आंदोलनात सहभाग घेतला. तसेच निळवंडे चे पाणी व वांबोरी चारीचे हक्काचे पाणी मिळवून देवूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
नक्की वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य
अनेक योजनांचा वर्षाव
महायुतीने लाडकी बहीण, लाडका भाऊ, वीजबील माफी, शेतकरी सन्मान योजना, दूध अनुदान, पीक विमा, संजय गांधी निराधार योजना अशा अनेक योजनांचा वर्षाव करुन लाभार्थी मतदारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढवलेली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून महायुतीने काही धडा घेतलेला होता. त्यावर उपाय योजना केल्या. फेक नरेटीव्ह ला समर्थ पर्याय दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळची व आत्ताची परिस्थिती खूप बदवली होती. ती महायुती साठी सकारात्मक होती. अल्पसंख्याकांच्या वोट जिहादला बहुसंख्याकांचे व्होटजिहाद हे शस्त्र महायुतीने शस्त्रसाठ्यातून बाहेर काढले. खरे तर लोकसभा निवडणुकीत यश देणारे वोट जिहाद शस्त्र बुमरँग झाले होते. त्यामुळे महायुतीची त्सुनामी आली, ती अधिकच प्रभावी ठरली.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर
मतदानात एकतीस हजारांची वाढ (Prajakt Tanpure)
लोकसभा निवडणुकीत महायुती, एनडीए गाफील राहिली त्याचा फटका बसला होता. त्या चूका विधानसभा निवडणुकीत दुरुस्त केल्या. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे या दृष्टीने प्रबोधन मंचाने विशेष काम केले. प्रबोधन मंचाने मतदान कोणाला करा हे आजिबात सांगितले नाही पण लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे हा आग्रह धरला. त्यामुळे मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा तीस हजार मतदान वाढले. गत निवडणुकीत दोन लाख दहा हजार मतदान झाले होते. यंदा त्यात एकतीस हजारांची वाढ झाली होती. या वाढीव मतदान टक्केवारीने राज्यात सर्व वाहिन्यांचे एक्झिट पोलच्या अंदाजात राज्यात फरक पडला. तसाच तो या मतदारसंघात ही पडला. वाढीव मतदानाचा फायदा सत्ताधारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डीले यांना मिळाला.
गत निवडणुकीत कर्डीले यांना ८५ हजार ९०८ मते मिळाली होती. आमदार प्राजक्त तनपुरे यांना १ लाख ९२ हजार ३४ मते मिळाली होती. खरे तर भारतीय जनता पक्षा तून अंर्तगत मतांची रसद यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांना यावेळी मिळणार नव्हती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी या वेळी पडद्याआड समझोता केला नव्हता. किंबहुना गत लोकसभा निवडणुकीत केलेला असा समझोता त्यांनी मोडला. त्यामुळे वीस पंचवीस हजार मतांमध्ये घाट होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे घाट झालेली पाहण्यास मिळाली. त्यामुळे चाळीस हजार मतदानात अधिक मते जो घेणार तो राहुरीचा आमदार होणार होता. त्यात शिवाजीराव कर्डीले यांनी बाजी मारली.
अंर्तगत गटबाजीचा फटका बसणार नाही अशी भाजपने व्यवस्था केली होती. त्यातच व्होटजिहाद चा फायदा मतदान टक्केवारी वाढण्यास झाला. या पाच वर्षात मतदारसंघात सामाजिक स्वास्थ धोक्यात आणणारे दोन घटना घडल्या होत्या. उंबरे येथील बालिका अत्याचार प्रकरण सर्वाधिक स्फोटक घटना होती. राज्य नव्हे तर केंद्रीय पातळीवर तो विषय तापला होता. राहुरीच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा या प्रकरणी निघाला होता. त्यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डीले व तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील ठामपणे बहुसंख्य हिंदू समाजाचे बाजूने ठामपणे ऊभे राहिले. अर्थात त्याचा फायदा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना त्यांनी मतदारसंघात वाढवून ठेवलेल्या अँन्टिइनकमबन्सी फँक्टरने मिळाला नाही. माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा अँन्टिइनकमबन्सी फँक्टरचा काहीच संबंध नव्हता. त्यामुळे त्यांना हा फायदा मिळाला. गुहा येथील कानिफनाथ मंदीर वाद पुढे आला. या दोन्ही प्रकरणात आमदार प्राजक्त तनपुरे यांची भुमिका दूरदृष्टीची नाही असे चित्र समाजासमोर आले. लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांच्या विजयी मिरवणुकीत वेगळा गुलाल ऊधळला गेला. या घटनेनंतर या प्रचारात समाजमाध्यमात परत राहुरीत याची पुनरावृत्ती करायची काय असा प्रश्न उपस्थित केला गेला. अशा महत्त्वाच्या प्रसंगात गप्प राहण्याची भूमिका अडचणीत आणत आहे. हे लक्षात आल्यावर मी पण हिंदू असून मी तुळजाभवानी चे दर्शन करुन अर्ज दाखल करीत आहे असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. पण समाजाला हिंदुत्वासाठी लढवय्ये नेतृत्व हवे होते. ती गरज माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी पूर्ण केली. ती त्यांना लाभदायी ठरली.
या वेळी माध्यमांपेक्षा समाज माध्यमातून ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. परीणामी विकासकामे, स्थानिक प्रश्न याचा प्रचारात जोर असला तरी मतदारांना तो भावला नाही. राज्यात सत्तापालट झालेवर माजी आमदार शिवाजी कर्डीले मतदारसंघात अधिक सक्रिय झाले.सत्ताधारी सरकारच्या माध्यमातून अनेक लाभार्थीच्या योजनांना गती मिळाली. संजय गांधी निराधार योजनेचे अडीच हजार लाभार्थी या काळात वाढले. या शिवाय बेरजेचे राजकारण करीत माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राजूभाऊ शेटे यांना आमदार कर्डीले यांनी सोबत घेतले. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तालुका विकास मंडळाचे चाचा तनपुरे यांना बरोबर घेत बेरजेचे राजकारण केले पण त्याचा अपेक्षित लाभ मिळाला नाही.
विकास कामांचा मुद्दा खरे तर प्रभावी होता पण त्या पेक्षा राज्य स्तरीय प्रचाराचे मुद्दे अधिक प्रभावी ठरले.या मतदारसंघात आमदार कर्डीले चौथ्यांदा निवडणूक लढवीत होते.मतदारसंघातील जनता त्यांना व ते मतदारांना चांगले परीचयाचे आहेत. त्यामुळे ते गुन्हेगार आहेत. त्यांच्या वर गुन्हे दाखल आहेत. ते कमी शिकलेले आहेत. स्थानिक नाहीत. आमदार प्राजक्त तनपुरे सुशिक्षित, स्थानिक, तालुक्याचा स्वाभिमान, दूरदृष्टीचे नेते आहेत असे मुद्दे प्रचारात आणले गेले पण मतदारांना ते प्रभावित करीत नाहीत हे या आधीच सिद्ध झाले होते. पण राज्य स्तरीय मुद्दे प्रभावशाली ठरत आहेत म्हणून परत या प्रतिमेवर आधारित प्रचाराचा आधार घेतला गेला. तो विशेष उपयोगी पडला नाही. लांब पल्ल्याचे नेतृत्व म्हणून आमदार प्राजक्त तनपुरे यांचे कडे पाहिले जात आहे. पाच वर्षात मतदारसंघातील जनमताचा आधार व्यापक करता करता अँन्टिइनकमबन्सी फँक्टर केव्हा प्रभावी ठरला हे खरेतर लक्षातच आले नाही. केलेल्या विकास कामांपेक्षा न झालेल्या, न केलेल्या कामांमुळे स्वतःच्या मतदानाची वाढविता आली नाही. गतवेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांना ५४.३१ टक्के मते मिळाली होती. मंत्रीपदाचा वापर करुनही त्यांची टक्केवारी घटली.अल्पसंख्याक मतापेक्षा बहुसंख्याकांच्या मतांचा आधार अशी प्रतिमेने माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना आमदार केले.
राहुरीत गतवेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी चांगले मताधिक्य घेतले होते. यंदा त्यांना राहुरीत रोखण्यात कर्डीले यशस्वी ठरले. पाथर्डी व नगर तालुक्यातील गटात कर्डीलेंचा प्रभाव होताच. तो यंदाही कायम राहिला. राहुरीतील मतदानाची तिरंगी प्रभावी लढतीत मतविभागणी यंदा झाली नाही. सरळ लढतीत तनपुरे यांना होम ग्राउंडवर रोखण्यात कर्डीले यशस्वी ठरले. खरेतर महायुतीची व्यूहरचनाच प्रभावी ठरली. त्यामुळे कर्डीले गतवेळी हरलेली लढाई जिंकू शकले. “मी पाय जमिनीवर असलेला नेता आहे. कायम जनतेत रहाणारा माणूस आहे. “हा विजय हिंदुत्वाचा विजय आहे.” अशी आमदार शिवाजी कर्डीले यांची प्रतिक्रिया बरीचशी बोलकी आणि समर्पक आहे. लोकसभा निवडणूकतील पराभवाचा वचपा काढला जावा असे आवाहन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले होते. त्यामुळे या विजयाचे श्रेय ते देखील घेत आहेत. खरेतर हे श्रेय जनतेने स्वतःहून देणे आवश्यक असते हे यांच्या यंत्रणेला मान्य नसावे. प्रचारात शरदचंद्र पवार व खासदार निलेश लंके यांच्या प्रचार सभा झाल्या. तर महायुती तर्फे पंकजा मुंडे, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचार सभा घेतल्या. कर्डीले यांचा विजय विखेंसाठी गत निवडणुकीतील त्यांच्या भुमिकेचे परीमार्जनासाठी आवश्यक ठरलेले होते. त्यामुळे विखेंची भाजपा तील प्रतिमा अधिक उंचावणारी ठरणार आहे.