
Pratibha Chakankar : नगर : अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात विविध बाजूंनी चौकशी सुरु आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakanakar) यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांची आज (ता.१३) शिर्डी पोलीस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचा मुलगा चिन्मय याचाही जबाब नोंदवण्यात आला. समता संस्थेमध्ये आपल्या नावावर असलेले खाते हे बनावट असून आपण त्यावर एक रुपयांचा व्यवहारदेखील केला नाही, त्यातील सर्व सह्या बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकरा यांनी माध्यमांसमोर केला.
हेही वाचा : बनावट शिक्षक भरती प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल; खोट्या नियुक्ती आदेशावरून दांपत्याची आर्थिक लूट
समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे चार खाती आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर मुलाच्या नावे दोन खाती असून, त्यातून २ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. प्रतिभा चाकणकरांच्या संबंधित खात्याला वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव आहे.
खाते आमचं नाही, सह्या बनावट
चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, संबंधित खाती बनावट आहेत. हे खाते मी उघडलं नाही, त्यावरच्या सह्या देखील माझ्या नाहीत. आम्ही एकही रुपयाची उलाढाल केलेली नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. तसंच, देवदर्शनाच्या नावाखाली अशोक खरातने कागदपत्रं घेतली आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा वापर करून खाती उघडली असावीत, असा आरोपही त्यांनी केला. आम्हाला शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळाली नव्हती. मात्र माध्यमांमधून बातम्या पाहिल्यानंतर आम्ही स्वतःहून पोलिस ठाण्यात येऊन जबाब दिला, असं प्रतिभा चाकणकरांनी सांगितलं. कागदपत्रं खरी असली तरी सह्या बनावट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
नक्की पहा : कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाची कारवाई
वकिलांचाही दावा, खातीच बनावट (Pratibha Chakankar)
प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी सांगितलं की, “प्रतिभा आणि त्यांच्या मुलाच्या नावाने समता पतसंस्थेत बनावट खाती उघडण्यात आली आहेत. त्या कधीही त्या पतसंस्थेत गेल्या नाहीत. खाते उघडताना चुकीचा पत्ताही वापरण्यात आला. सह्यांचे नमुने पोलिसांना देण्यात आले असून पुढील तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल.”


