Praveen Rishi Ji Maharaj : नगर : आचार्य सम्राट परमपूज्य आनंदऋषी महाराज (Anand Rishiji Maharaj) यांच्या तपोभूमी व कर्मभूमी असलेल्या अहिल्यानगर, आनंदधाम (Anand Dham) येथे २०२६ साली होणाऱ्या चातुर्मासासाठी तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती आयोजन समितीने दिली आहे. ता. ९ जून २०२४ रोजी अश्वी येथे झालेला विराट दीक्षा महोत्सव भक्तिभावाने व भव्यतेने साजरा झाला. या महोत्सवात देशभरातील विविध भागातून हजारो जैन बांधव आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री
चातुर्मासाचा योग आनंदधाम इथे घडावा अशी केली विनंती
एका छोट्या खेड्यात म्हणजेच अश्वी गावात १० हजारहून अधिक श्रद्धाळूंनी उपस्थिती लावून या महोत्सवाला प्रेरणादायी आणि अभूतपूर्व बनवले. या दीक्षा महोत्सवात उपस्थित असलेल्या अनेक श्रद्धाळूंनी अखिल भारतीय श्वेतांबर स्थानक जैन कॉन्फरन्सचे वरिष्ठ मार्गदर्शक व ट्रस्टी अशोक बाबू बोरा यांच्या समोर २०२६ साली अहिल्यानगर आनंदधाम येथे उपाध्याय प्रवर प्रवीणऋषी महाराज साहब यांचा चातुर्मास व्हावा, अशी भावना व्यक्त केली. अशोक बोरा यांनी या भक्तजनांच्या भावनांचा सन्मान ठेवत उपाध्याय प्रवर प्रवीणऋषी महाराज (Praveen Rishi Ji Maharaj) यांच्यासमोर अहिल्यानगर आनंदधाम या तपोभूमीचा उल्लेख करत व हवाला देत २०२६ साली चातुर्मासाचा योग अहिल्यानगर आनंदधाम इथे घडावा, अशी विनंती गुरुदेव समोर ठेवली. त्यांच्या या विनंतीला अहिल्यानगर येथून उपस्थित श्रद्धाळूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
नक्की वाचा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन
प्रवीण ऋषी महाराज म्हणाले, (Praveen Rishi Ji Maharaj)
राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषी महाराज यांचे जीवन आणि साधनेने अत्यंत प्रभावित झाले आहेत. “माझ्या गुरुवर्यांच्या आनंददरबारात चातुर्मास करण्याकरीताची मला विनंती करण्याची ही आवश्यकता नाही, कारण ते माझे श्रद्धास्थान असून आम्हा शिष्यांचे हक्काचे स्थान आहे. येथे चातुर्मास करण्यासाठी मी सदैव उत्साहित असतो, तसेच येथे चातुर्मास व्हावा, अशी सुप्त इच्छा देखील मनात नेहमीच असते. आचार्य भगवंतांच्या प्रेरणेतून साकारलेले आनंदधाम आणि त्यांच्या कर्मभूमी अहिल्यानगर चा दाखला देत केलेल्या चातुर्मासाच्या विनंती ला मी अस्वीकार करूच शकत नाही.” असे सांगत त्यांनी तपोभूमी आनंदधाम येथे चातुर्मास करण्याच्या या विनंतीला आनंदाश्रूंनी सहर्ष स्वीकृती दिली. चातुर्मासाच्या तयारीसाठी भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था, देशभरातून येणाऱ्या श्रद्धाळूंसाठी निवास व्यवस्था आणि विविध उपक्रमांसाठी स्वयंस्फूर्त सेवक (वॉलंटियर्स) मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.
या ऐतिहासिक चातुर्मासाला यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती स्थापन करण्यात येणार असून, भक्तगणांची बैठक आयोजित केली जाणार आहे. याशिवाय, उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषी महाराज यांच्या अर्हम विज्जा अंतर्गत अनेक शिबिरे देखील चातुर्मासाच्या काळात घेतली जातात. या शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला असून, चातुर्मासादरम्यान आयोजित शिबिरांमध्ये भाग घेण्यासाठी आपली नावे नोंदविण्यास प्रारंभ केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आचार्य सम्राट आनंदऋषी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात अशोक बोरा यांनी उपाध्याय प्रवर प्रवीणऋषी महाराज यांना अहिल्यानगर आनंदधाम येथे आठाई तपाची परंपरा कायम ठेवण्याचे निवेदन केले. २००९ साली आनंदधाम येथे झालेल्या चातुर्मासादरम्यान सुरू झालेल्या आठाई तप परंपरेचा उल्लेख करत, उपाध्याय प्रवर प्रवीणऋषी महाराज यांनी २०२६ च्या चातुर्मासादरम्यान २ हजार ६०० आठाई तप पूर्ण करण्याची भावना व्यक्त केली. या भावनेला उपस्थित भक्तगणांनी आनंदाने व उत्साहाने स्वीकृती दिली.