Punyashlok Ahilyadevi Holkar : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला (Government) मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
अहिल्यादेवींनी २८ वर्षं राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, घाटांचे बांधकाम, धर्मशाळांची उभारणी, गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य त्यांनी केले.
अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी
म्हणून त्या ‘लोकमाता’ ठरल्या (Punyashlok Ahilyadevi Holkar)
अहिल्यादेवी होळकर यांनी काशी, अयोध्या, मथुरा, पंढरपूर, नाशिक, जेजुरीसह देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांच्या स्वतःच्या निधीतून केला. त्यांनी सोमनाथ येथील मंदिर नव्याने बांधले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करतांना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. एवढी श्रीमंती असतानाही त्या योग्याप्रमाणे जीवन त्या साधेपणाने जीवन जगल्या. त्यांनी स्वतःसाठी धन खर्च केले नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले, म्हणून त्या ‘लोकमाता’ ठरल्या.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आज देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जात आहे. जिल्ह्यातील एक लाख एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबविण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्श समोर ठेवीत शासनाने लोकहिताचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. धनगर समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जपण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार सुरेश धस, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री अण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा विकास आराखडा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य आणि आदर्श आज ३०० वर्षांनंतरही तितकंच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने शासनाने ६८१ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यांच्या नावाने एक भव्य स्मारक, महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’, आणि त्यांच्यावर आधारित एक बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांचे कार्य देशभरात पोहोचविले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांचे प्रजाहिताचे धोरण राबविण्यावर शासनाचा भर : एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान चौंडी मराठी संस्कृतीचे जागृत देवस्थान आहे. लोककल्याणकारी राज्य, सुराज्य जगाला दाखविण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. अहिल्यादेवींनी सर्वसामान्य माणसांच्या विकासाचे काम केले. त्यांनी धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. महिलांसाठी सैनिक तुकडी सुरू करण्याची त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
६८१ कोटी रुपये मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय: राम शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासनाच्यावतीने २०१७ पासून साजरी करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळासाठी शासनाने ६८१ कोटी रुपये मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मागणी केल्यानंतर अवघ्या १६ महिन्यांच्या कालावधीतच जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली, असे सभापती राम शिंदे यांनी म्हटले.