Pure Vegetarian : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुधोडी येथे २९ व्या धर्मनाथ बीजोत्सव सोहळ्यात काल्याचे नाथपंथी कीर्तन करताना मिलिंद महाराज चवंडके (Milind Maharaj Chavandke) यांनी उपस्थित सर्वांना आपापले घर पवित्र रहाण्यासाठी शुध्द शाकाहार (Pure Vegetarian) करण्याचे आणि शरिराच्या पावित्र्यासाठी व्यसनमुक्त (Addiction Free) रहाण्याचे आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद देत दुधोडी पंचक्रोशीतील उपस्थित महिलांनी हात उंचावून घरात शाकाहारच तयार करू, अशी शपथ घेतली तर ग्रामस्थांनी व्यसनमुक्त रहाण्याचा संकल्प केला. भाविकांनी चवंडके महाराजांच्या हातून तुळशीमाळाही घालून घेतल्या. भाविकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने आयोजक भारावून गेले.
नक्की वाचा : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी
दुधोडी येथे पुरातन धर्मनाथ मंदिर असल्याने धर्मनाथ बीजोत्सव सोहळा भाविक ग्रामस्थ अत्यंत श्रध्देने साजरे करतात. २९ व्या धर्मनाथ बीजोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यासाठी मिलिंद महाराज चवंडके यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा उपजोनिया पुढती येऊ| काला खाऊ दहिभात || वैकुंठी तो ऐसे नाही | कवळ काही काल्याची || एकमेका देऊ मुखी | सुखे घालू हुंबरी | तुका म्हणे वाळवंट | बरवे नीट आणि उत्तम || हा काल्याचे महत्व वर्णिणारा अभंग घेतला होता. कीर्तनाच्या पूर्वरंगात नाथ संप्रदायातील धर्मनाथांचे चरित्र आणि उत्तर रंगात भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सांगताना त्यांनी दररोजच्या जीवनातील दिलेली उदाहरणे उपस्थितांना चांगलीच भावली.
अवश्य वाचा : यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गालाच सीबीएससी : दादा भुसे
धर्मनाथ बीज साजरी करण्याचे गोरक्षनाथांनी सांगितलेले महत्त्व
धर्मनाथांचा जन्म, त्यांची नाथपंथी दीक्षा, कठोर तपश्चर्या, विद्याभ्यास, देव-देवतांचा वरप्रसाद आणि धर्मनाथ बीज साजरी करण्याचे गोरक्षनाथांनी सांगितलेले महत्त्व आज २९ व्या वर्षातील काल्याच्या कीर्तनात प्रथमच तपशीलवार ऐकले, असे उपस्थितांनी मंडपातच जाहिरपणे सांगितले.
घरात शुध्द शाकाहारीच स्वयंपाक करण्याची दिली शपथ (Pure Vegetarian)
तेव्हा मिलिंद महाराज चवंडके यांनी धर्मनाथांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. येथील पावित्र्य जपण्याचे प्रत्येक ग्रामस्थाचे आणि भगिनीचे प्रथम कर्तव्य आहे. भगिनींनी आज आपले घर जसे पवित्र आहे तसे कायम ठेवण्यासाठी घरात शुध्द शाकाहारीच स्वयंपाक करेल अशी शपथ धर्मनाथांचे स्मरण करत घ्यावी, असे म्हणताच उपस्थित सर्व महिलांनी-युवतींनी हात उंचावून जाहिरपणे शपथ घेतली. ग्रामस्थांनी व्यसनमुक्त रहाण्याचा संकल्प करावा असे आवाहन मिलिंद महाराज चवंडके यांनी केले. कीर्तन मंडपातील वातावरण धर्मनाथांच्या प्रेरणादायी आख्यानाने भारावून गेले होते. आबुशेठ खुडे व शिवाजी जांभळे यांच्या हस्ते मिलिंद महाराज चवंडके यांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले.
या ऐतिहासिक कीर्तनास गायनाची सुरेल साथ -हभप दत्तात्रय महाराज खांदवे, बंकट महाराज जगताप, कृष्णा महाराज जंजिरे व दत्तात्रय महाराज जंजिरे यांनी केली. मृदूंगाची साथ प्रदिप अंबादास जांभळे व कृष्णा महाराज यांनी केली. हार्मोनियमची साथ रोहिदास जांभळे व राजू सय्यद यांनी केली. सर्वश्री रावसाहेब जांभळे, भिमराव भोसले, दत्तात्रय शिंदे, बापू भोसले, पै.प्रदिप जांभळे, अशोक जांभळे, सोमनाथ शिंदे, भिमराव जांभळे, शंकर कांबळे यांच्या भजनी मंडळाने ठेका धरत छान साथ दिली. काल्याच्या कीर्तन सोहळ्यास हभप सखाराम महाराज म्हस्के, शिक्षक संघटनेचे नेते रघुनाथ ठोंबरे,ऑडीटर भरत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हरिनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच रविंद्र जांभळे, हनुमंत गोळे, गणेश जांभळे, झुंबर जांभळे राजेंद्र भोसले यांच्यासह परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रकाश किसन परकाळे यांनी उत्सवातील काल्याचा महाप्रसादाची व्यवस्था केली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी सहकुटूंब या महाप्रसादाचा लाभ घेतला.