Purushottam Karad : शेवगाव : शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र व ढोरजळगाव येथील रहिवासी, सध्या मुंबई येथे सायबर क्राइम विभागात (Cyber Crime Department) पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले पुरुषोत्तम नारायण कराड (IPS) (Purushottam Karad) यांना गुणवत्तापूर्ण सेवा व उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार (President’s Award) जाहीर झाला आहे. हा मानाचा पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.
नक्की वाचा: मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट बँडची शहिदांना संगीतमय आदरांजली
पोलीस उपअधीक्षक (DSP) म्हणून सेवेत प्रवेश
शेतकरी कुटुंबातून आलेल्या पुरुषोत्तम कराड यांनी कठोर परिश्रम, जिद्द व प्रामाणिकपणाच्या बळावर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून २००२ साली पोलीस उपअधीक्षक (DSP) म्हणून सेवेत प्रवेश केला. सेवाकाळात त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
अवश्य वाचा: हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ (Purushottam Karad)
गुन्हेगारी नियंत्रण, जनतेशी थेट संवाद, तक्रार निवारण, महिला व बालसुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात दाखवलेली तत्परता विशेष उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संवेदनशील व गुंतागुंतीच्या प्रकरणांचा यशस्वी तपास करण्यात आला असून, त्यामुळे पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनसामान्यांशी आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
या निवडीमुळे शेवगाव तालुका, ढोरजळगाव गावासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून येऊनही उच्च पदापर्यंत पोहोचता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण पुरुषोत्तम कराड यांनी समाजासमोर ठेवले आहे.
संक्षिप्त परिचय
नाव : पुरुषोत्तम नारायण कराड
शिक्षण : M.Sc. (Agri)
सेवेत प्रवेश : २००२ – पोलीस उपअधीक्षक (DySP)
पदोन्नती :
२०१० – पोलीस उपायुक्त (DCP)
२०१४ – भारतीय पोलीस सेवा (IPS)
सेवास्थळे :
गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई
सध्याचे पद : पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा, मुंबई
प्राप्त पुरस्कार :
केंद्र शासनाचे अंतर्गत सुरक्षा पदक
महाराष्ट्र शासनाचे खडतर सेवा पदक
महाराष्ट्र शासनाचे फोर्स वन सेवा पदक
पोलीस महासंचालक यांचे पदक
भारत सरकारचा राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदक



