नगर : तब्बल २५ वर्षांपासून रशियाची (Russia) सत्ता चालवणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अध्यक्षपदाच्या (President Of Russia) निवडणुकीत ८८ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे सलग पाचव्यांदा पुतिन हे रशियाची सूत्रं हाती घेणार आहेत. रविवार (ता.१७) च्या निकालांनुसार व्लादिमीर पुतिन यांना ८७.९७ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. १९९९ पासून रशियात पुतिनराज आहे. बोरिस येल्तसिन यांनी १९९९ मध्ये त्यांच्याकडे सत्तेची सूत्र सोपवली होती. तेव्हापासून पुतिन एकही निवडणूक हरले नाहीत.
नक्की वाचा : महापालिकेकडून पुन्हा शास्ती माफीचा निर्णय; ३१ मार्चपर्यंत लाभ घेता येणार
निकालात पुतिन विजयी (Vladimir Putin)
शुक्रवारी (ता.१५) सुरु झालेलं मतदान तीन दिवस चालले. त्यानंतर लागलेल्या निकालात पुतिन यांनी विजय मिळवला. पुतिन यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला. त्यांचे इतर टीकाकार तुरुंगात आहेत. ७१ वर्षीय पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली. ज्यांना क्रेमलिनचे जवळचे मानले जाते. आता पुतिन पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत.
पुतिन यांच्या विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शनं केली होती. पार पडलेली निवडणूक निष्पक्षपाती आणि स्वतंत्र नव्हती असं अमेरिकेने म्हटलं आहे. मात्र आता पुतिन यांच्या विजयानंतर त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ हा निश्चित झाला आहे. या विजयामुळे पुतिन यांनी दीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा जोसेफ स्टॅलिन यांचा रेकॉर्ड मोडला आहे. रशियाच्या इतिहासात मागच्या दोनशे वर्षात दीर्घकाळासाठी राष्ट्राध्यक्ष राहण्याचा रेकॉर्ड हा पुतिन यांच्या नावे झाला आहे.
अवश्य वाचा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर : सुजय विखे पाटील
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांचे ऑनलाईन मतदान (Vladimir Putin)
रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदान केलं. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. व्लादिमीर पुतिन यांनी पहिलं मतदान केलं. त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. पुतिन यांच्याविरोधात शुक्रवार आणि शनिवारी अनेक ठिकाणी निदर्शने करून मतपत्रिका खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.