Radhakrishna Vikhe Patil : नगर : पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी देणारे स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांची स्वप्नपूर्ती होत आहे. त्यांच्या प्रयत्नातून मुळा उच्चस्तरीय उजव्या कालव्याच्या वांबोरी चारी टप्पा एकच्या स्थापत्य यांत्रिक व विद्युत घटकाची दुरुस्ती करण्यासाठी १४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच मुळा धरणांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला आहे. पुढील काही काळामध्ये हा गाळ काढला जाणार आहे. त्यामुळे अडीच टीएमसी पाणीसाठा वाढेल. या पाणीसाठ्याचे नियोजन करून दुष्काळात या पाण्याचा वापर केला जाणार आहे. तसेच स्व. शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या मागणीनुसार अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यात झालेल्या नुकसानीसाठी २५३ कोटी रुपये दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील
अक्षय कर्डिले यांची जबाबदारी आमच्यावर
पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील निर्धार मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी मुळा उच्चस्तरीय उजवा कालव्याच्या वांबोरी चारी टप्पा एक स्थापत्य यांत्रिक व विद्युत घटकांची दुरुस्ती कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे, माजी सभापती संभाजी पालवे, भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, मिर्झा मनियार, पुरुषोत्तम आठरे, वैभव खलाटे, सुनील साठे, अनिल गीते, एकनाथ आटकर, सुभाष बर्डे, सचिन वायकर, महादेव कुटे, शिवाजी पालवे, वैभव ढाकणे, संतोष शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, अक्षय कर्डिले यांची जबाबदारी आमच्यावर आली आहे.
ही निवडणुकीची सभा नाही, स्व. शिवाजीराव कर्डिले यांची उणीव अक्षय कर्डिले यांनी भासू द्यायची नाही. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांनी करावे, लोकांचे व्यसन असणारी व्यक्ती घरात बसली नाही. त्यांनी शरीराकडे दुर्लक्ष करता २४ तास उपलब्ध असणारे नेतृत्व काळाच्या आड गेले आहे. या भागात कधीही ऊसाचे टिपरू नव्हते, वांबोरी चारी मुळे या भागातील शेती सिंचनाखाली आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)
स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिराईत भागातील प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. जिल्ह्यातील कुठल्याही नेत्यांनी ते केले नाही. अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे उभे राहणार आहे. वांबोरी पाणी योजनेचे लाईट बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते, तेव्हा शिवाजीराव कर्डिले यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ते माफ केले. त्यांच्यामुळे ते काम होत आहे तो माणूस आपल्यात नाही. शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली असेल तर अक्षय कर्डिले यांना निवडणुकीतून द्यावी लागेल. स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे नाव वांबोरी चारी टप्पा एक व दोनला दिले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. अक्षय कर्डिले म्हणाले की, माझ्या वडिलांनी मला दिला जाणारा वेळ जनतेला दिला आहे. ते कधीही घरात कार्यक्रमासाठी थांबत नसत. आमच्यावर किती संकटे आले पण ते घाबरले नाही ते म्हणायचे की काही होत नाही. त्यांनी तयार केलेले जनतेचे छत्र माझ्याबरोबर उभे केले आहे. तुमचे प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही, वडिलांसारखेच काम करण्याचा प्रयत्न करील माझ्याकडून काही चूक झाल्यास पदरात पाडून घ्या, अशी भावनीक साद त्यांनी घातली.



