Radhakrishna Vikhe Patil : नगर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची (MIDC) निवड झाली आहे. सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज दिला. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी (Shirdi) एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार आहे, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा : ‘गोदावरी’च्या नूतनीकरणासाठी २०० कोटीचा निधी द्या; मंत्री विखेंची फडणवीसांकडे मागणी
कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन
डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, विकास आयुक्त डॉ. दीपेंद्रसिंह खुशावत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह उद्योजक कौस्तुभ धवसे, गणेश निबे आदी उपस्थित हाेते.
अवश्य वाचा : भंडारदरा धरण ९० टक्के भरले; काेणत्याही क्षणी पाणी साेडण्याची शक्यता
स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध (Radhakrishna Vikhe Patil)
शिर्डी एमआयडीसीचा परिसर हा ५०२ एकराचा आहे. यातील २०० एकर जागा सवलतीच्या दरात देण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच इतर सवलतीच्या दरांसाठी राज्यमंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. हा निर्णय शिर्डी, नगर, नाशिक तसेच आसपासच्या जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शिर्डी क्षेत्र हे देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असल्याने एक औद्योगिक हब म्हणून उदयास येईल, असा विश्वास महसूलमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.