Radhakrishna Vikhe Patil : राहाता : पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू आहेत. या विकासाच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल (Revenue Minister) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
अवश्य वाचा: लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका; गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका
पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा: ‘जो हिंदू हित की बात करेगा,वही देश पर राज करेगा’;’धर्मवीर-२’चा नवा ट्रेलर प्रदर्शित
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)
राहाता पंचायत समितीच्या इमारतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला सक्षम करण्याचे काम होणार आहे. ही इमारत विकासाचे मंदीर म्हणून नावारूपाला येणार आहे. इमारतीसाठी खास बाब म्हणून मान्यता देण्याचे काम तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले, अशी माहिती त्यांनी दिली. राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभामुळे महिला सक्षम होणार आहेत. महिला उद्योजक व्हाव्यात यासाठी महिला बचतगटांना प्रोत्साहन दिले जाईल. येत्या काळात जिल्ह्यातील ७० हजार तरुणांना वेगवेगळ्या औद्योगिक अस्थापनांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेत पहिल्या सहा महिन्यांसाठीचे मानधन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून दिले जाईल. गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी १९१ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. समुद्रात वाहून जाणारे ५३ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासनाने मंत्रीमंडळात ६२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दहा वर्षांत प्रथमच जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे, असेही त्यांनी सांगितले.
नवीन प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे, अशी अपेक्षा आमदार पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामविकास मंत्री असताना राज्यात ९८ पंचायत समित्यांच्या इमारतींना ४३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचेही त्या म्हणाल्या.
अशी आहे नवीन प्रशासकीय इमारत राहाता पोलीस स्टेशनशेजारी असलेल्या १९९२.३१ चौरस मीटर जागेत १४ कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीतून ही दोन मजली इमारत साकार झाली आहे. या इमारतीत पंचायत समितीच्या विविध प्रशासकीय विभागांचे २० हून अधिक सुसज्ज दालने आहेत. शंभर जणांच्या बैठक व्यवस्थेचे सभागृह आहे. इमारतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.