Radhakrishna Vikhe Patil : नगर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या वर्चस्वाखालील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) व माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखालील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. विखे पाटील कारखान्यासाठी ९ मे रोजी तर थोरात कारखान्यासाठी ११ मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे मागील निवडणुकांतील पराभवाचा बदला घेऊन विखे- थोरात आपापला हिशोब चुकता करणार का, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष असेल.
२०२० मध्ये दोन्ही कारखान्याच्या निवडणुका झाल्या होत्या बिनविरोध
पाच वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्येही विखे कारखाना व थोरात कारखाना या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात विखे व थोरात यांनी अद्याप आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या नाहीत. मात्र, गेल्या दोन वर्षात झालेल्या विधानसभा, लोकसभा व गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विखे- थोरात यांच्यात जो टोकाचा संघर्ष झाला, त्यामुळे आगामी कारखाना निवडणुकीत हा संघर्ष कोणते वळण घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गणेश साखर कारखान्याची सत्ता मंत्री विखे यांच्या ताब्यात होती. भाजपचे विवेक कोल्हे व काँग्रेस नेते थोरात यांच्या युतीने विखे यांच्या ताब्यातून सत्ता हिसकावली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष लोकसभा व विधानसभा निवडणुकीत टोकाला गेला होता. साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही त्याच्या पुनःप्रत्ययाची शक्यता आहे.
निवडणुकीतील पराभव थोरातांच्याही जिव्हारी (Radhakrishna Vikhe Patil)
गणेश कारखाना निवडणुकीत थोरात- कोल्हेंनी एकत्र येत विखेंच्या मंडळाचा दारूण पराभव केला. लोकसभा निवडणुकीत थोरात यांनी डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या पराभवसाठी ताकद लावली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांनी संगमनेरात लक्ष घालून थोरातांचा पराभव करत ‘गणेश’सह लोकसभेचा बदला घेतल्याचे बोलले गेले. आता संगमनेरात महायुतीचे अमोल खताळ हे आमदार आहेत. कारखाना निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभव थोरातांच्याही जिव्हारी लागला आहे. त्यामुळे प्रवरेच्या कार्यक्षेत्रातील विखे विरोधकांना थोरात ताकद देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गेल्या ४० वर्षांपासून आपापले कारखाने बिनविरोध करण्यासाठी कट्टर विरोधक असलेल्या विखे-थोरातांची सुरु असलेली सहमती एक्स्प्रेस पुन्हा धावणार की मागील निवडणुकांतील पराभवाचा बदला घेऊन विखे- थोरात आपला हिशोब चुकता करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.