
Radhakrishna Vikhe Patil : अकोले : जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) (NCP Sharadchandra Pawar) नेत्या सुनीता भांगरे (Sunita Bhangre), त्यांचे पुत्र राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी नुकतीच भेट घेतली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या सुनीता भांगरे या पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमित भांगरे, अपक्ष म्हणून उभे असणारे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. त्यात भांगरे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्या निवडणुकीत व नंतरही अमित भांगरे यांनी आमदार डॉ. लहामटे यांच्यावर शरद पवार यांची साथ सोडल्याबद्दल सडकून टीका केली होती. तसेच आपण शरद पवार यांची साथ कधीही सोडणार नाही, असे वेळोवेळी जाहीर केले होते.
नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे
भाजप प्रवेशाच्या चर्चा (Radhakrishna Vikhe Patil)
या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमित भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे हेही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सुनीता भांगरे यांचे पती दिवंगत ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. भांगरे कुटुंब आणि विखे परिवाराचे अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जिल्ह्यावर सध्या मंत्री विखे यांचे राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे सुनीता भांगरे यांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर सुनीता भांगरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत.


