Rain Alert: महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात दमदार पाऊस (Heavy Rain) बरसणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे, मुंबई भागासह मराठवाड्यालाही झोडपले आहे. यावेळी रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई शहरासह उपनगरात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून (Department of Meteorology) वर्तवण्यात आला आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!मनोज जरांगेचं उपोषण स्थगित
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र व कोकणात जोरदार पावसाचा इशारा (Rain Alert)
मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्राकार वाऱ्यांची स्थिती विदर्भ आणि जवळच्या भागात सक्रीय आहेत. त्यामुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण भागात पावसाचा जोर राहणार आहे. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
कोणत्या भागात पावसाचा अलर्ट?(Rain Alert)
मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून नांदेडमध्ये मध्यम सरींचा अंदाज असून लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. उद्यापासून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : ‘एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका’;लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने मराठवाड्यातील धरणपातळीत वाढ झाली असून जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. मराठवाड्यातील बहुतांश धरणे आता भरण्याच्या मार्गावर असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.पुण्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. मात्र सध्या पावसाने इथे विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुण्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो.