Raksha Bandhan : नगरः बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). मात्र, सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या सैन्य दलातील (Army) जवान आणि पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरे करता येत नाहीत. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून डॉन बॉस्को इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन शुक्रवारी (ता.८) पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. कोकरे यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.
नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर
पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे अशक्य
आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलीस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत, त्यामुळे यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा, अशी संकल्पना डॉन बॉस्को इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड बुरखाव यांनी मांडली.
अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!
विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने पोलीस भारावले (Raksha Bandhan)
मुख्याध्यापक फादर रिचर्ड बुरखाव यांनी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांसह तोफखाना पोलीस ठाणे गाठले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बांधल्या. रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करणाऱ्या वाहतूक पोलिसांना देखील राखी बांधून ओवाळले. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मुलींच्या आदरामुळे भारावले होते. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सर्व विद्यार्थिनींना पेन भेट दिले. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, कल्पना चव्हाण, पूनम श्रीवास्तव, पोलीस उपनिरीक्षक दळवी, दिनकर व सर्व पोलीस अंमलदार, शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.