Ram Navami : संगमनेर: श्रीराम नवमी (Ram Navami) निमित्ताने विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल (Bajrang Dal), दुर्गावाहिनी-मातृशक्ती आयोजित शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सनई चौघडे, लहान मुले श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, शबरी वेशभूषेत श्रीराम पंचायत आकर्षक बग्गीत बसले होते. पारंपरिक वाद्य, ढोल ताशा पथक, साईदर्शन डी.जे., गजराज डी.जे. पुढे तरुणांनी श्रीरामांच्या गाण्यांवर ठेका धरला होता. जय श्रीरामांच्या जयघोषाने संगमनेर नगरी दुमदुमली होती. तर नंदिवर विराजमान झालेल्या शिव शंकर भगवान पाहण्यासाठी महिलांसह लहान मुले, तरुण मिरवणुकीत सहभागी झाले होते.
नक्की वाचा: रांजणगाव मशीद येथील दरोड्यातील सहा आरोपी गजाआड
पाळणा हलवून श्रीरामांचा जन्मसोहळा साजरा (Ram Navami)
यावर्षी शहरापाठोपाठ उपनगर व तालुक्याच्या ग्रामीण भागातही या उत्सवाची धूम अनुभवयाला मिळाली. शहर व तालुक्यातील बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये मध्यान्नाला पाळणा हलवून श्रीरामांचा जन्मसोहळा साजरा केला गेला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी सायंकाळी अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेचे आयोजन केले होते. नवीन नगर रोड, बसस्थानक, शिवस्मारक, मोमीनपुरा, चावडी, मेनरोड, सय्यद बाबा चौक, नेहरु चौक आणि चंद्रशेखर चौक अशा लांबलचक मार्गावरुन निघालेल्या या शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची संख्या अभूतपूर्व होती. त्यामुळे चौकाचौकात मिरवणूक रेंगाळत असल्याचेही दिसून आले.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त विकासकामे: विखे पाटील
शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत (Ram Navami)
शाही स्वरुपात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेच्या पुढ्यात आकर्षक रांगोळी रेखाटली जात होती. त्या पाठोपाठ सनई-चौघडा, हातात भगवाध्वज घेतलेले तरुण-तरुणी, सांडणीस्वार, गोमाता बचाओचा संदेश देणारा चित्ररथ, सजवलेल्या रथात श्रीराम-लक्ष्मण व सीतामातेची वेशभूषा केलेली बालके, अघोरी नृत्य, महिलांसाठी स्वतंत्र डीजे, ढोलताशा पथक, तरुणाईचे आकर्षण असलेला डीजे, प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिकृती, महाबली हनुमानाची आणि शंकराची वेशभूषा केलेला तरुण आणि हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले नागरिक असे दृश्य पाहणार्या प्रत्येकाचाच उत्साह वाढवणारे होते. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले जात होते. रात्री साडेदहाच्या सुमारास शोभायात्रेचे चंद्रशेखर चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीरामाची आरती होवून श्रीराम नवमी उत्सवाची सांगता झाली.