Ram Shinde | मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा

0
Ram Shinde
Ram Shinde

Ram Shinde | नगर : राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. ही बाबा आपल्यासाठी निश्चितच भूषणावह आहे. प्रशासनामार्फत या बैठकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांची अत्यंत शिस्तबद्धरीतीने अंमलबजावणी करावी. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावत बैठक यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिले. बैठकीसाठी येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – सचिन कुर्मींच्या हत्येमागे भाजप व शिवसेना नेत्याचा कार्यकर्ता; कुटूंबाचा आरोप

बैठकीला यांची उपस्थिती (Ram Shinde)

चौंडी (ता. जामखेड) येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नक्की वाचा – लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी मिळणार

चौंडीत तयारी (Ram Shinde)

प्रा. राम शिंदे म्हणाले, चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी प्रशासनाने अत्यंत सुक्ष्मपणे व काटेकोरपणे नियोजन केले आहे. बैठकीसाठी विविध समित्यांची स्थापना करुन अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने एकसंघपणे काम करत दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी. चौंडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांना दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. बैठकीसाठी मंत्रिमंडळाबरोबरच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहनांसाठी पुरेशा प्रमाणात पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. बैठकस्थानी वैद्यकीय पथक तैनात करण्यात यावे. रुग्णवाहिका, तात्पुरते रुग्णालय उभारण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात औषधी व मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशामक यंत्रणा ठेवण्यात यावी. परिसरामध्ये स्वच्छता राहील याची काळजी घेण्यात यावी. बैठकीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत व अखंडित राहील, यादृष्टीनेही आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रा. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

बैठक स्थळाच्या कामाची प्रा. राम शिंदे यांच्याकडून पाहणी (Ram Shinde)

चौंडी येथे बैठकीसाठी करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रशासनातील सर्व वरिष्ठ  अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.  बैठकीसाठी उभारण्यात येत असलेला कक्ष, माध्यम कक्ष, भोजन कक्ष, सचिवालय कक्ष, ग्रीन रूम, हेलिपॅड तसेच पार्किंग व्यवस्थेची पाहणी करत व्यवस्थेमध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही तसेच हे काम विहित वेळेत पूर्ण होण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here