Ram Shinde : कर्जत: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) गटातून बाहेर पडलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar) आठ आणि काँग्रेस पक्षाचे तीन अशा ११ नगरसेवकांनी आपल्या पक्षाला रामराम करीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपच्या (BJP) मुंबई कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रवीण घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या ११ नगरसेवकांच्या भाजप पक्षप्रवेशाने आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षास मतदारसंघात मोठे खिंडार पडले आहे.
नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप
तत्कालीन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव
मागील अनेक दिवसांपासून कर्जत नगरपंचायतीमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आमदार रोहित पवार यांची एकहाती असलेली सत्ता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उलथून टाकत सत्तांतर घडवले. आमदार रोहित पवार गटातील १५ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवक सत्तेतून बाहेर पडत त्यांनी राम शिंदे गटाशी घरोबा केला होता. यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ८ तर काँग्रेसच्या ३ नगरसेवकांचा समावेश होता. या दरम्यान तत्कालीन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात सत्तांतर होणार हे अटळ होते. सभापती राम शिंदे यांनी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांना नगराध्यक्षा तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संतोष मेहेत्रे यांना उपनगराध्यक्ष करीत रोहित पवारांवर बंडखोरी करीत बाहेर पडलेल्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश न करता मनाचा मोठेपणा दाखवत कुरघोडी केली होती. तदनंतर नूतन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि इतर नगरसेवकांनी एकत्र येत शनिवारी भाजपात जाण्याचा मानस भाजप नेते प्रवीण घुले यांच्याकडे व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने प्रवीण घुले यांनी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार गटातील बाहेर पडलेले एकूण ११ नगरसेवक भाजपात प्रवेश करतील असे पत्रकार परिषदेत सांगितले होते.
अवश्य वाचा : ‘अमित शहांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे मला पहा आणि फुलंं वहा’-हर्षवर्धन सपकाळ
कर्जतच्या विकासासाठी मार्गक्रमण करू (Ram Shinde)
मंगळवारी (ता.२७) संध्याकाळी ५ वाजता नगराध्यक्षा रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, सतीश पाटील, नगरसेविका छाया शेलार, लंकाबाई खरात, ताराबाई कुलथे, ज्योती शेळके, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला. आज कर्जत नगरपंचायतीवर प्रवीण घुले यांच्या माध्यमातून आणि सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा झेंडा फडकला. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधीनी कायदा हातात घेत हुकूमशाहीने सत्ता मिळवली होती. मात्र, आपण कायदेशीर मार्गाने पुन्हा भाजपाची सत्ता आणली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाची नवीन अध्यादेश निर्णय पारित करण्यात मोलाचे सहकार्य लाभले. मागील तीन वर्षांच्या काळात जो विकास खुंटला होता. त्यास आगामी काळात योग्य दिशेने कर्जतच्या विकासासाठी मार्गक्रमण करू, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिली.