Ram Shinde : केसनंद येथील 65 एकर जमीन प्रकरणी 8 दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे सभापतींचे निर्देश

0
Ram Shinde : केसनंद येथील 65 एकर जमीन प्रकरणी 8 दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे सभापतींचे निर्देश
Ram Shinde : केसनंद येथील 65 एकर जमीन प्रकरणी 8 दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे सभापतींचे निर्देश

Ram Shinde : नगर : मौजे केसनंद, तालुका हवेली, जिल्हा पुणे (Pune) येथील गट क्रमांक 101 व 102 (जुना स.नं. 164 व 165) या सुमारे 65 एकर जमिनीबाबत मूळ कब्जेदारांच्या वारसांचे नाव असताना, सन 1930-31 मध्ये कोणत्याही फेरफार नोंदी किंवा वैध दस्तऐवजाशिवाय इतर व्यक्तींची नावे 7/12 उताऱ्यावर दाखल झाल्याच्या गंभीर प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी नियम 101 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक 619 अनुषंगाने दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

हे वाचा: नागपूरमध्ये साकारणार अद्यावत नूतन विधिमंडळ वास्तू

तीव्र नाराजी व्यक्त

या प्रकरणी मार्च 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील लक्षवेधीवर झालेल्या चर्चेप्रसंगी तहसिलदार हवेली यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अभिलेखांमध्ये ठोस कागदपत्रांचा अभाव असल्याने प्रथमदर्शनी गंभीर अनियमितता व भ्रष्टाचाराची शक्यता व्यक्त करण्यात आली होती तसेच पीएमआरडीएने अतिक्रमण हटविण्याचे आदेश देऊनही प्रत्यक्षात कारवाई न झाल्याचे निदर्शनास आले होते. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला असतानाही कार्यवाही न झाल्याबद्दल तसेच परिसरात अनधिकृत बांधकामांची संख्या प्रकरण न्यायालयात गेलेले असतानाही वाढत असल्याबद्दल सभापती प्रा. राम शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नक्की पहा: महाराष्ट्रातील विद्यार्थी दिल्लीत करणार शिवजयंती

गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश (Ram Shinde)

यावेळी येत्या आठ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण प्रकरणाचा वस्तुनिष्ठ व सविस्तर अहवाल सादर करण्याचे तसेच अनधिकृत बांधकामे करणारे तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी, पुणे यांनी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश सभापतींनी दिले. या बैठकीस विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-3 डॉ. विलास आठवले, सचिव-4 श्री. शिवदर्शन साठ्ये, पुणे झोन-7 चे पोलीस उपायुक्त सोमेय मुंडे, सहसचिव महसूल विभाग अजित देशमुख, जिल्हाधिकारी पुणे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी पाटील, आयडीआरओ पुण्याचे मंगेश खामकर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.