Ram Shinde : कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat-Jamkhed Assembly Constituency) मागील निवडणुकीचे प्रतिस्पर्धी असणारे महायुतीकडून भाजपाचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यातच पुन्हा सरळ लढत होणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवार आपल्यावर नाराजी असणाऱ्याचे मन वळविण्यात यशस्वी झाले. विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी माघारी घेतले. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार
मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. प्रतिस्पर्धी असणारे आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवारांचा राजकीय संघर्ष प्रचारापूर्वीच शिगेला पोहचला आहे. दोन्ही तुल्यबळ नेते एकमेकांना कायम कडवा विरोध करताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. हाच कडवा संघर्ष आगामी काळात प्रचाराच्या निमित्ताने आणखी तीव्र पहावयास मिळणार आहे. सोमवारी (ता.४) विधानसभा उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस होता. यात महायुतीकडून विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ आणि काँग्रेसचे नेते कैलास शेवाळे यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. दोन्ही भूमिपुत्रांनी माघार घेत आपली भूमिका पक्षासोबत ठेवली आहे. यासह मनसेचे रवींद्र कोठारी, रासपाचे स्वप्नील देसाई इतर ८ असे एकूण १२ जणांनी आपले विधानसभा उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
महायुती आणि महाविकास आघाडी बंडाळी रोखण्यात यशस्वी (Ram Shinde)
कर्जत-जामखेडसाठी ११ उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीकरीता मैदानात उतरले असून यात मुख्य लढत पुन्हा एकदा भाजपाचे माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यात रंगणार आहे. आमदार रोहित पवार आपला बालेकिल्ला कायम राखतात की आमदार राम शिंदे त्यांना धोबीपछाड देतात? हे पाहणे रंजक ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडाळी रोखण्यात दोघे यशस्वी झाले असले तरी त्यांची भूमिका काय असेल हे निकालानंतरच समजेल.
कर्जत-जामखेड विधानसभा उमेदवारी असणारे पक्षनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे-
प्रा. रामदास शंकर शिंदे – भाजपा, रोहित राजेंद्र पवार – राष्ट्रवादी शरद पवार, दत्तात्रय आत्माराम सोनवणे – बसपा, करण चव्हाण – आरपीआय, राम प्रभू शिंदे – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, सोमनाथ भैलुमे – वंचित, राम नारायण शिंदे – अपक्ष, रोहित चंद्रकांत पवार – अपक्ष, शहाजी उबाळे – अपक्ष, सतीश कोकरे – अपक्ष आणि हनुमंत निगुडे – अपक्ष