Ram Shinde : कर्जत : एरव्ही एकमेकांकडे ढुंकूनही न पाहणारे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार. प्रा राम शिंदे (Ram Shinde) गुरुवारी (ता.१९) सायंकाळी नागपूर येथे एका कार्यक्रमात एकत्र आले. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद (Legislative Council) सभागृहाच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल रोहित पवार यांनी हस्तांदोलन करीत हास्य करत फुलांचा गुच्छ देत अभिनंदन केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या या कृतीचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील (Karjat-Jamkhed Constituency) नागरिकांनी मात्र कौतुक केले.
नक्की वाचा : कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा ; खासदार नीलेश लंके यांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी
राजकीय कडवा संघर्ष महाराष्ट्र राज्याने पाहिला (Ram Shinde)
पवार आणि शिंदेंची राजकारणा पलीकडील या मैत्रीचे दर्शन मतदारसंघासाठी सुखावह ठरले. मागील पंचवार्षिक निवडणुकीपासून आमदार रोहित पवार आणि माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांचा राजकीय कडवा संघर्ष महाराष्ट्र राज्याने पाहिला. दोन्ही तुल्यबळ नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नव्हते. यंदाच्या निवडणुकीत तर दोघांनी आपला राजकीय संघर्ष अधिकच तीव्र केला. प्रचारात एकमेकांची उणी-दुणी काढताना कधी-कधी तर जीभ देखील घसरली गेली. मतमोजणीच्या दिवशी अंतिम क्षणी दोन्ही नेते मतमोजणी कक्षात हजर होते. मात्र, त्यांनी एकमेकांकडे साधे पाहिले देखील नाही. शेवटच्या फेरीपर्यंत कर्जत-जामखेडचा निकाल ताणला गेला. यात रोहित पवार यांनी बाजी मारली. तर अल्प मतांनी राम शिंदेंना दुसऱ्यांदा निसटता पराभव स्वीकारावा लागला.
अवश्य वाचा : सौंदाळा ग्रामसभेने घेतला आदर्शवत ठराव; शिव्या दिल्या तर होतोय 500 रुपयांचा दंड
यंदा निवडणुकीत विचारपूस देखील केली नाही (Ram Shinde)
२०१९ ला चोंडी निवासस्थानी रोहित पवार गेले असता राम शिंदेंनी त्यांना फेटा बांधत शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदा दोघांनी पण शेजारी-शेजारी असताना साधे विचारपूस देखील केली नाही किंवा अभिनंदन केले नाही. राम शिंदे या निकालावर खुश नव्हते. तर रोहित पवार देखील या अल्प मताधिक्याच्या विजयाने आनंदी दिसले नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीने मोठे यश मिळवत सत्ता कायम राखली. तर रोहित पवारांना मागील अडीच वर्षाप्रमाणे यंदा देखील विरोधी आमदार म्हणून विकासकामे आणावी लागतील. तर राम शिंदे सत्ताधारी आमदार म्हणून कामे करतील.
त्यात यंदा मतदारसंघाचे भाग्य आणखी उजळून निघाले गुरुवारी प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपसभापती नीलम गोरे यांनी आसनावर बसवत पदाची सूत्रे बहाल केली. सर्व राजकीय क्षेत्रांतून राम शिंदेंवर शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला. मात्र, संध्याकाळी नूतन सभापती राम शिंदेंचे आमदार रोहित पवार यांचे अभिनंदन करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच मतदारसंघात या मैत्रीपूर्ण संबंधाची सकारात्मक चर्चा झडताना दिसल्या. या दोन्ही अभ्यासू नेत्यांनी अशीच मैत्रीपूर्ण संबंध कायम राखत मतदारसंघाचा विकास करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी केली.