
Ram Sutar Passes Away : महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार (Ram Sutar) यांचं वृद्धापकाळाने निधन( Passes Away) झालं आहे. त्यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली (Tributes paid by both Deputy Chief Ministers) अर्पण केली आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्याचा मुलगा आयपीएल गाजवणार; मराठमोळा खेळाडू ओंकार तारमळे नेमका कोण ?
राम सुतार कोण होते ? (Ram Sutar Passes Away)
राम सुतार यांचा हुबेहूब, जिवंत पुतळे उभारणीत हातखंडा आहे. त्यांच्या शिल्पकृतीतील मानवीय भाव हे सूक्ष्म आणि बोलके होते. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे त्यांचे मूळ गाव असून राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १९ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्पं उभारली आहेत. त्यामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा उभारणीचे काम सुद्धा त्यांनी केले आहे.
सुतारांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर‘ काळाच्या पडद्याआड– शिंदे

शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मभूषण‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण‘ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी त्यांची झालेली भेट शेवटची ठरली, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; ३१ डिसेंबरनंतर ‘या’ लाडक्या बहिणींचा लाभ थांबणार
नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अनेक अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यात जिवंत राहतील. वयाच्या १०१ व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी नवीन पिढीतील हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड – अजित पवार
राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्प साकारली. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. गेल्याच महिन्यात त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला होता. साधेपणा आणि नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूगार आज शांत झाला असला तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. राम सुतार यांचे निधनाने भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा उत्तुंग प्रतिभेचा शिल्पकार आपण गमावला आहे.त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


