Ramadan Eid : नगर : शहरात रमजान ईद (Ramadan Eid) (ईद-उल-फित्र) सोमवारी (ता. ३१) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी १० वाजता ईदची सामुदायिक नमाज (Namaz) कोठला येथील ईदगाह मैदानात अदा करण्यात आली. मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. नमाजसाठी शहरातील मुस्लिम (Muslim) बांधव अबाल वृध्दांसह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. रमजानच्या महिन्यात केलेल्या रोजाची सांगता ईदच्या दिवशी झाली.
नक्की वाचा : बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण;सुरेश धस यांचा दावा!
शहरातील विविध मशिदमध्ये ईदच्या नमाजची व्यवस्था
रमजान महिन्याच्या २९ उपवासानंतर रविवारी (ता. ३०) संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागातील मशिदमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती.
अवश्य वाचा : तिसऱ्या दिवशी ७०, ७९ आणि ९२ किलो वजनी गटातील मल्लांनी गाजवले मैदान
युवकांनी झळकावले वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध दर्शविणारे फलक (Ramadan Eid)
ईदगाहच्या सामुदायिक नमाजनंतर धार्मिक एकात्मता आणि देशाच्या समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. तर मुस्लिम समाजाच्या वतीने काही युवकांनी वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध दर्शविणारे फलक झळकावले. ईद शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच कोठला येथून जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले व बिर्याणीचा बेत होता. रविवारी झालेला गुढी पाडवा व सोमवारी झालेल्या ईदचा उत्साह शहरात दिसून आला. शहरात दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या व पाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा देत होते. यानिमित्त शहरात सामाजिक एकतेचे दर्शन घडले.