Ramadan Eid: रमजान ईद हा बंधुभाव व समतेचा संदेश देणारा सण: थोरात

रमजान ईद आनंदाचा, बंधूभावाचा सण

0

Ramadan Eid: संगमनेर: भारतामध्ये विविध धर्म, पंथ, जात असूनही मानवताधर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे. रमजान ईद (Ramadan Eid) हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेने हा सण साजरा करतात. यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभाव व समतेचा संदेश (A message of equality) देणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले. ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, नितीन अभंग ,डॉ. सातपुते, श्रीपाल शहा, अमित गुंजाळ, गणेश मादास ,सुभाष दिघे, भारत बोराडे, किशोर टोकसे, सादिक तांबोळी, लाला बेपारी, अहमद शेख यांसह मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा- ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

रमजान ईद आनंदाचा, बंधूभावाचा सण (Ramadan Eid)

यावेळी शुभेच्छा देताना थोरात म्हणाले की, रमजानचा महिना हा पवित्र महिना असतो. मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा उपवास करतात. खरे तर रमजान ईद चा सण हा आनंदाचा, बंधूभावाचा सण आहे. संपूर्ण जगात हा सण साजरा होत असून एकात्मता आणि मानवता धर्म जोपासण्याचा संदेश देणार हा सण आहे. राज्यात सुरू असलेल्या खरात प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, काही वेळा धर्माचा वापर हा चुकीच्या पद्धतीने होताना दिसतो आहे, हे थांबले पाहिजे. राज्यात सध्या धर्माच्या व अंधश्रद्धेच्या नावाखाली चाललेल्या काही गोष्टी ह्या अत्यंत दुर्दैवी आहे. धार्मिक तणाव पसरवण्याचा काही जण प्रयत्न करत आहे. तालुक्यात महिला व मुली सुरक्षित नाही असे वातावरण आहे. सध्या माफीयांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा टोळ्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. यांच्या माध्यमातूनच हे अत्याचाराचे प्रकार वाढत आहे. अमली पदार्थांची तस्करी माफीयेगिरी तालुक्यात आणखी वाढत आहे. गुन्हेगारांना आळा घालणं त्यांना कडक शासन करणे ही शासनाची जबाबदारी असून तिला कोणी पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.     

नक्की वाचा- वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

संगमनेर तालुक्यात कायम सर्वधर्मसमभावाचे वातावरण (Ramadan Eid)

तर माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, रमजान ईद हा सण जगासह भारतात मोठ्या आनंदाने साजरा करतात. यानिमित्त महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराजवळ राहण्याचा उपवास हा मार्ग असून अंत:करणाच्या शुद्धीसाठी पवित्र उपवास केले जातात.रमजान ईद निमित्ताने सर्व बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. संगमनेर तालुक्यात कायम सर्वधर्मसमभावाचे वातावरण राहिले आहे. तालुका कायम सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपल्या तालुक्यात चांगली बाजारपेठ असून लोकांमध्ये एकजूट कायम आहे. सध्या मात्र धर्माच्या नावाखाली चुकीचे राजकारण सुरू आहे. विविध दुर्दैवी घटना घडत असून प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव, इतर सर्व धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.