Rasta Roko : कर्जत : राशीन (Rashin) (ता. कर्जत) येथील चौकात झेंडा लावणे आणि चौक नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून दोन गटात रोष निर्माण झाला होता. सदर घटनेचा क्रांतिसूर्य महात्मा फुले फाऊंडेशनने (Mahatma Phule Foundation) निषेध नोंदवत प्रशासनास धारेवर धरले. प्रशासनाने सहकार्य न केल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी सोमवारी (ता.१४) दुपारी कर्जत शहरात रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन केले. यावेळी तालुका प्रशासनाने याच आठवड्यात बैठक घेत त्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या लेखी देत आंदोलन स्थगित केले.
नक्की वाचा : तळेगाव निमोण परिसराला पाणी देणार : आमदार खताळ
चौकाचे नामांतर करण्यावरून वाद
राशीन येथील जुन्या करमाळा चौकास २६ जानेवारी २०१४ रोजी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक नाव देण्यात आले होते. मात्र, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका विशिष्ट समुदायाने चौकाचे नामांतर करण्याच्या उद्देशाने भगवा झेंडा लावला. आणि त्याचा जल्लोष करीत फटाके फोडले. या घटनेने ओबीसी समाजाच्या भावना दुखावले असून सोमवारी त्याचा निषेध तहसील कार्यालयावर महात्मा फुले फाऊंडेशन यासह ओबीसी बांधवांनी निषेध मोर्चा काढला. तसेच सदरच्या घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यात प्रशासनास अपयश आले असल्याच्या तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या.
अवश्य वाचा : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २६ गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नामांतर तात्काळ निकाली काढण्याची मागणी (Rasta Roko)
सदरचा भगवा झेंडा आणि त्या आडून चौकाचे होणारे नामांतर तात्काळ निकाली काढावे, या मागणीसाठी कर्जतच्या महात्मा फुले चौकात रास्ता रोको करण्यात आले. तब्बल दोन तास आठवडे बाजार असून रास्ता रोको आंदोलन झाले. अखेर तालुका प्रशासनाच्यावतीने निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सौताडे यांनी या प्रश्नांवर याच आठवड्यात दोन्ही समुदायाची बैठक आयोजित करून गावभावना लक्षात घेत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तसेच सदरच्या बैठकीत अंतिम निर्णय येईपर्यंत त्या जागेस पोलीस बंदोबस्त देत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची खबरदारी घेतली जाईल, असे लेखी आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्यात यश मिळवले. यावेळी कर्जत शहरात मोठा चक्काजाम झाला होता.