Rasta Roko Movement | पाणी प्रश्नासाठी राजूर बंद करून रास्ता रोको आंदोलन

अनेक वर्षांपासून राजूर गावाला अनियमित पाणीपुरवठा

0

Rasta Roko Movement : अकोले: तालुक्यातील राजूर गावासाठी भंडारदरा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी देऊन कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवावा, या मागणीसाठी आज (ता.६) गाव बंद ठेवण्यात येऊन कोल्हार-घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको (Rasta Roko Movement) आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून राजूर गावाला पाणीप्रश्न भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर थेट भंडारदरा धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी मिळावे, यासाठी ग्रामस्थांच्यावतीने आज राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी गावातून फेरी काढून कोल्हार-घोटी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अवश्य वाचा- अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

अनेक वर्षांपासून राजूर गावाला अनियमित पाणीपुरवठा (Rasta Roko Movement)

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून राजूर गावाला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहे. वारंवार पाणीपुरवठा बिघाड होऊन अनेक दिवस पाण्यापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून भंडारदरा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे राजूर गावाला पाणी देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. यावेळी माजी सरपंच काशिनाथ भडांगे, राजेंद्र वाघ, अविनाश बनसोडे यांनी देखील आपल्या भाषणातून भंडारदरा धरणातून थेट पाणी द्यावे, अशी मागणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सामाजिक कार्यकर्ते किरण माळवे, माजी सरपंच गणपत देशमुख, श्रीराम पन्हाळे, रचना टिभे, संगीता पवार आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्यावतीने जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मधुकर बिन्नर, मंडल अधिकारी भोजने यांनी निवेदन स्वीकारले. यावर लवकरात लवकर उपायोजना करण्याच्या दृष्टीने आश्वासन दिले.