Ratan Tata:रतन टाटांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव 

0
Ratan Tata:रतन टाटांना 'भारतरत्न' देण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव 
Ratan Tata:रतन टाटांना 'भारतरत्न' देण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव 

नगर : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यात आज एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली (Tribute) म्हणून हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर आज ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याचा केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘माझी राजकीय भूमिका पवार साहेबांच्या संमतीनेच’-अजित पवार

रतन टाटांच्या जाण्याने देशाचा आधारस्तंभ कोसळला (Ratan Tata)

या शोक प्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत रतन टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

अवश्य वाचा : राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता,हवामान विभागाचा अंदाज

कोविडमध्ये रतन टाटांकडून पीएम रिलीफ फंडाला १५०० कोटीची मदत (Ratan Tata)

टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजकांसाठी आणि भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरेल. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणी करण्यात टाटा समूहाचा सिंहाचा वाटा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला. मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफी-चहा पर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले मोठे योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६/११  च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएम रिलीफ फंडाला तत्काळ १५०० कोटी रुपये दिले. तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे.

नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता.त्यांनी कधीही आपल्या ‘टाटा मूल्यां’शी तडजोड केली नाही. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं. महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव फायदा झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here