Ravindra More : राहुरी : दूध,कापूस व ऊस उत्पादक शेतकरी(Farmer) रस्त्यावर उतरले आहेत. राज्य व केंद्र सरकारने यातून योग्य तो धडा घ्यावा अन्यथा येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari sanghtana) जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला. ऊस,कापूस व दूध उत्पादकांच्या प्रश्नावर राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी राहुरीत आज राहुरी बाजार समिती समोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko) करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे नेते रवींद्र मोरे बोलत होते.
नक्की वाचा : ‘पापलेट’ माश्याला आता जीआय मानांकन मिळणार
मोरे म्हणाले की, या सरकारच्या धोरणामुळे आज शेतकरी कंगाल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करण्यापेक्षा या शेतकरी विरोधी धोरण घेणाऱ्या लोकांना ,नेत्यांना गोळ्या घेतल्या पाहिजेत. याशिवाय शेतकरी विरोधी धोरणात बदल होणार नाही. कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामूळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. दूध दरात महिनाभरात दहा रुपयांची घट झाली आहे. मात्र ग्राहकांना जुन्या वाढीव दरानेच दुधाची विक्री होत आहे. तर साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणाऱ्या निर्णयामुळे ऊस उत्पादकांचेही नूकसान होणार आहे. एकीकडे केंद्र सरकार इथेनॉल पेट्रोल मध्ये एकत्रित करण्याची टक्केवारी वाढवते. इथेनॉल दर वाढवते पण इथेनॉल निर्मितीसाठी बंधन घालत आहे.
अवश्य वाचा : नेवासेत माउलींचा जयघोष करत दीपोत्सव साजरा
शेतकरी विरोधी या धोरणात बदल न झाल्यास केंद्र व राज्य शासनाला तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी स्वाभिमानी संघटनेने दिला आहे. शेतकरी मृत झालेला आहे. त्याच्यात काहीच त्राण राहिलेले नाही. म्हणून आंदोलनात दशक्रिया विधीच्या वेळी म्हणली जाणारी भजने म्हणण्यात आली, असं यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी आंदोलकांनी दूध ओतून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी आंदोलनामुळे वाहनांची झालेली कोंडी व त्यातून प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भाषणे झाली. तहसीलदार चंद्रसिंग राजपूत व पोलीस निरीक्षकांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. किशोर वराळे,प्रमोद पवार, दिनेश पवार, दिनेश वराळे,प्रसाद देशमुख, सचिन गडगुळे,अनिल इंगळे आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. एक तासाच्या रास्तारोकोमुळे नगर मनमाड राज्य मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.