Raymond Group | नगर : ‘रेमंड’ला (Raymond Group) जागतिक दर्जावर घेऊन जाणारे माजी अध्यक्ष डॉ. विजयपत सिंघानिया (वय ८७) (Vijaypat Singhania) यांचे शनिवारी (ता. २८) सायंकाळी मुंबई येथे निधन झाले. २० वर्षे रेमंडचे नेतृत्व करून विजय सिंघानियांनी ब्रँडला एक जागतिक स्तरावर पोहोचवले होते. त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांना भारत सरकारने २००६मध्ये पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांचे पुत्र आणि रेमंडचे सध्याचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, ‘अत्यंत दुःखाने आणि जड अंतःकरणाने, आम्ही पद्म भूषण डॉ. विजयपत कैलाशपत सिंघानिया यांच्या निधनाची माहिती देत आहोत’.
अवश्य वाचा- मढीत शिव पाणंदचे राज्यस्तरीय अधिवेशन; ट्रस्टींकडून सहकार्याचे आश्वासन
चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
विजयपत सिंघानिया यांच्यावर रविवारी (आज) चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुटुंबीय आणि मित्र परिवाराने आज (रविवारी) दुपारी १:३० वाजता हवेली, एल. डी. रुपारेल मार्ग येथे जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विजयपत सिंघानिया यांनी १९८० ते २००० या काळात रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, रेमंडने केवळ सूट आणि कपड्यांपुरते मर्यादित न राहता, सिंथेटिक फॅब्रिक्स, डेनिम, स्टील, औद्योगिक फाईल्स आणि सिमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तार केला.
हे वाचा – मोहटादेवी गडावरील वासंतिक नवरात्रोत्सवाची सांगता
‘मानद एअर कमोडोर’ या पदवीने सन्मानित
सिंघानिया यांनी रेमंडला भारतातील सर्वात प्रतिष्ठित जीवनशैली आणि फॅब्रिक ब्रँडपैकी एक म्हणून स्थापित केले. १९९४ मध्ये, त्यांना भारतीय हवाई दलातर्फे ‘मानद एअर कमोडोर’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. विमानचालन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले. नोव्हेंबर २००५ मध्ये, वयाच्या ६७ व्या वर्षी, त्यांनी सुमारे ६९००० फूट उंचीवर हॉट एअर बलून उडवून एक ऐतिहासिक कामगिरी केली. माध्यमांच्या वृत्तानुसार, विजयपत सिंघानिया यांनी अंदाजे १२००० कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेवली आहे. २०१५ मध्ये, त्यांनी आपल्या कंपनीतील ३७ टक्के हिस्सा आपल्या मुलाकडे सुपूर्द केला. त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया, आता रेमंड ग्रुपचे प्रमुख आहेत.



