नगर : आरटीजीएस (RTGS)आणि एनईएफटीचा (NEFT) नियमित वापर करणार्यांसाठी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता ग्राहकांची चुकीच्या खात्यात पैसे पाठवण्यापासून सुटका होणार आहे. कारण इथून पुढे आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे पैसे पाठवताना ग्राहकांना,पैसे पाठवणाऱ्या लाभार्थ्याचे नाव पाहता येणार आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. या सुविधेमुळे ग्राहकांना पैसे पाठवण्यापूर्वी ते योग्य लाभार्थ्यालाच पैसे पाठवत आहेत का? याची खात्री करता येणार आहे.
नक्की वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी केली ‘ही’ मागणी
यूपीआय आणि आयएमपीसद्वारे पैसे पाठवताना ग्राहकांना आधीपासूनच लाभार्थ्याच्या नावाची खात्री करण्याची सुविधा उपलब्ध आहे.याचप्रमाणे आता आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा ही सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत आरबीआयने ३० डिसेंबर रोजी माहिती दिली आहे. दरम्यान आरबीआयने बँकांना १ एप्रिल २०२५ पर्यंत ही प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. चुकीचे व्यवहार कमी करणे हे या सुविधेमागील उद्दिष्ट आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ही नवीन सुविधा विकसित करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यानंतर बँका ते त्यांच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतील. दरम्यान बँकेत जाऊन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनाही ही सुविधा वापरता येणार आहे.
अवश्य वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल
कसे काम करणार नवी प्रणाली ? (RTGS, NEFT Transactions)
आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे व्यवहार करताना,ग्राहकांना लाभार्थ्याचा खाते क्रमांक आणि शाखेचा IFSC कोड टाकायला लागेल, त्यानंतर लाभार्थ्याचे नाव दिसेल. एकदा योग्य लाभार्थ्यालाच पैसे पाठवत असल्याची खात्री केल्यानंतर पैसे पाठवणारा याला परवानगी देईन आणि व्यवहार पूर्ण होईल.
नागरिकांना काय फायदा मिळणार ?(RTGS, NEFT Transactions)
ही सुविधा सुरू झाल्यानंतर आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना याचे मोठे फायदे होणार आहेत. या सुविधेमुळे चुकीच्या लाभार्थ्याला पैसे जाण्याचे प्रकार कमी होतील. फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या कमी होईल आणि डिजिटल बँकिंग प्रणालीवर ग्राहकांचा विश्वास वाढेल. आरबीआयच्या या निर्णयामुळे भारतीयांसाठी डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.