REEL STAR : नगर : पाथर्डी-शेवगावमधील रिलस्टार (REEL STAR) असलेली महिला बसमध्ये प्रवाश्यांच्या पर्स चोरायची ही बाब आज (ता. ३) समोर आली आहे. या संदर्भात फिर्यादी महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने समांतर तपास करत बंटी-बबलीची जोडी गजाआड केली. त्यांच्याकडून तब्बल ९ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान
तिच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल
कोमल नागनाथ काळे (वय १९, रा. पाथर्डी रस्ता, भीमसेननगर, शेवगाव) व सुजित राजेंद्र चौधर (वय २५, रा. शंकरनगर, शेवगाव) अशी जेरबंद संशयित आरोपींची नावे आहेत. यातील कोमलही रिलस्टार आहे. तिच्या विरोधात यापूर्वी शिरुर कासार (जि. बीड), गेवराई (जि. बीड) व सुपा (ता. पारनेर) येथे गुन्हे दाखल आहेत. तर सुजितवर सोनई (ता. नेवासा) पोलीस ठाण्यात तीन, पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन तर चकलंबा (जि. बीड), तोफखाना, एमआयडीसी (ता. नगर) प्रत्येकी एक गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
कोमल व तिच्या साथीदाराने गुन्हा केल्याचे समोर (REEL STAR)
फिर्यादी या पाथर्डी-कल्याण बसमध्ये प्रवास करत असताना त्यांची पर्स चोरीला गेली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी हे करत असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा कोमल व तिच्या साथीदाराने केला असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले. त्यानुसार पथकाने पाथर्डी बस स्थानक परिसरात सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने चोरीचा मुद्देमाल सुजित राजेंद्र चौधर (वय २५, रा. शंकरनगर, शेवगाव) याचे कडे असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून ६.५ तोळे असा एकूण ९ लाख ३५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णू भागवत, फुरकान शेख, दीपक घाटकर, भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रकाश मांडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवान थोरात, जालिंदर माने, महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली.



