Reelstar Movie :’रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे

प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे 'रीलस्टार' मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

0
Reelstar Movie
Reelstar Movie

नगर : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. त्यातच आता समाजातील वास्तव चित्र दाखवणारा ‘रीलस्टार’ (Reel star) हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू झाले आहे. या चित्रपटात एक असा चेहरा मुख्य भूमिकेत झळकणार आहे, ज्याने आजवर काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे (Nagraj Majule) यांचा भाऊ भूषण मंजुळे ‘रीलस्टार’ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

नक्की वाचा : दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएलमध्ये दुसरा विजय;जेक फ्रेझर मॅकगर्क ठरला गेमचेंजर

दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस ‘रीलस्टार’चं दिग्दर्शन (Reelstar Movie)

‘रीलस्टार’ची निर्मिती जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनरखाली करण्यात येत आहे. मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या मल्टिस्टारर ‘अन्य’ या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस ‘रीलस्टार’चं दिग्दर्शन करीत आहेत. ‘रीलस्टार’च्या माध्यमातून एक वेगळा विषय हाताळण्याचं शिवधनुष्य उचलण्यात आलं आहे. अशा महत्त्वपूर्ण चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याची संधी भूषण मंजुळेला मिळाली आहे. भूषणने यापूर्वी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘कारखानिसांची वारी’, ‘घर बंदूक बिर्याणी’ या मराठी चित्रपटांसोबतच ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘रीलस्टार’च्या निमित्ताने तो प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आजवर भूषणने साकारलेल्या व्यक्तिरेखांचं नेहमीच कौतुक करण्यात आलं आहे. त्यामुळे ‘रीलस्टार’मधील भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी ठरणार आहे. 

अवश्य वाचा : आता ईडी आणि तपास यंत्रणांची लुडबूड थांबवा; शिंदे गटाचा नेता संतापला

भूषणची अभिनय शैली उत्तम-सिम्मी जोसेफ (Reelstar Movie)

भूषणच्या निवडीबाबत सिम्मी जोसेफ म्हणाले की,आम्हाला नायकाच्या भूमिकेसाठी एक फ्रेश चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना नवखाही वाटता कामा नये. भूषणने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं असल्यानं प्रेक्षकांना तो ठाऊक आहे. त्याची अभिनय शैली उत्तम असून, या चित्रपटातील नायकाला तो व्यवस्थित न्याय देऊ शकेल याची खात्री असल्याने भूषणची निवड केली गेली. कथानक ऐकताच क्षणी भूषण खूप भारावून गेला. एका वेगळ्या धाटणीचे कथानक असलेल्या चित्रपटाद्वारे नायकाच्या रूपात रसिकांसमोर येण्याची संधी मिळाल्याने त्याने ‘रीलस्टार’ची आॅफर आनंदानं स्वीकारली. यासाठी सध्या तो कसून मेहनत घेत असल्याचेही ते म्हणाले.

‘रीलस्टार’ची  पटकथा आणि संवादलेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांनी केलं आहे. भूषणसोबत यात उर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, महेंद्र पाटील, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर आदी कलाकार आहेत. बालकलाकार अर्जुन गायकर, तनिष्का म्हाडसे यांनी ‘रीलस्टार’मध्ये साकारलेल्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत. शिनोब यांनी सिनेमॅटोग्राफी, तर राहूल शर्मा यांनी प्रॉडक्शन डिझाईन केलं आहे. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर तसेच नंदू आचरेकर सह दिग्दर्शक आहेत. गुरु ठाकूर, मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार विनू थॅामस यांनी संगीतसाज चढवला आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी केली असून, वेशभूषा राणी वानखडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here