Revenue administration action: कोपरगाव: तालुक्यातील मळेगाव थडी, सांगवी भुसार, मायगाव देवी, सोनारी, कुंभारी परिसरातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाने कारवाई (Revenue administration action) करत मोठा धक्का दिला. तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकत सुमारे १८ वाळू उपसा करणाऱ्या फरंड्या जप्त केल्या. कारवाईदरम्यान घटनास्थळी वापरात असलेले दोर, साधने व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले. यातील काही साहित्य जागीच नष्ट करण्यात आले . अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकजण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
अवश्य वाचा- मढी यात्रेत दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद; १२ दुचाकी हस्तगत
अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे नुकसान (Revenue administration action)
गेल्या काही दिवसांपासून या भागात अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. अवैध उपशामुळे नदीपात्राचे नुकसान होत असून पर्यावरणावरही त्याचा परिणाम होत असल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले. तसेच यापुढेही नियमित गस्त व अचानक छापे टाकून अवैध वाळू उपशावर आळा घालण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.



