Robbery : नगर : शेवगावमधील मारवाडी गल्ली येथील दीपक जरांगे व निवृत्ती वाणी यांच्या घरात दरोडा (Robbery) टाकणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४८ तासांत जेरबंद केली. पथकाने जेरबंद आरोपींकडून एक लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अनिल शिवाजी भोसले (वय ४०), रोहन अनिल भोसले (वय १९, दोघे रा. गोंडेगाव, ता. शेवगाव), अमर दत्तू पवार (वय ३०), कृष्णा नारायण भोसले (वय २१, दोघे रा. नेवासा फाटा, ता. नेवासा), सुनील बाबाखॉ भोसले (वय २१, रा. गोंडेगाव, ता. नेवासा) असे जेरबंद आरोपींची नावे आहेत. शनिवारी (ता. ८) शेवगावमधील मारवाडी गल्लीतील दीपक जरांगे व सातपुते गल्लीतील निवृत्ती वाणी यांच्या घरात दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी जरांगे यांंच्या घरातून एक लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल तर वाणी यांच्या घरातून एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथके शेवगावला पाठविली होती. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पथकाने परिसरात माहिती घेतली तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, गोंडेगाव येथील अनिल भोसले व त्याच्या साथीदारांनी हा दरोडा टाकला आहे. अनिल भोसले हा सध्या त्याच्या घरी आहे. त्यानुसार पथकाने छापा टाकून अनिल भोसले व त्याचा मुलगा रोहन भोसले यांना ताब्यात घेतले. पथकाने त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने आणखी तिघांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांचा साथीदार दीपक इंदर भोसले (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) हा पसार आहे. त्याचा शोध पथक घेत आहे.
जेरबंद आरोपींच्या अंगझडतीत एक लाख ८५ हजार २०० रुपये किमतीचे चोरीचे १३ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक चाकू पथकाने हस्तगत केले. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जेरबंद आरोपींपैकी अनिल भोसलेवर यापूर्वी १०, अमर पवारवर १४ तर रोहन भोसलेवर एक गुन्हा दाखल आहे.