Robbery : पाथर्डी तालुक्यात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; दहा लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Robbery : पाथर्डी तालुक्यात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; दहा लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Robbery : पाथर्डी तालुक्यात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; दहा लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Robbery : पाथर्डी तालुक्यात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; दहा लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Robbery : नगर : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे दरोडा (Robbery) टाकून दहशत निर्माण करणाऱ्या ‘बदाम गँग’चा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अवघ्या ४८ तासांत सहा आरोपींना जेरबंद (Accused Arrested) केले. या कारवाईत तब्बल १० दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून १० लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमालेचे आयोजन

गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी

चिंचपूर पांगुळ येथील मळईवस्ती परिसरात १८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दगडू भिमराज बडे यांच्या घरी सहा अज्ञात इसमांनी दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला. यावेळी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत तसेच कपाटातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सापळा रचून आरोपी ताब्यात (Robbery)

पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढत मजले चिंचोली शिवारात सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बदाम कडू काळे (रा. शिरोडी, ता. गंगापूर), साईनाथ चव्हाण, ऋतिक चव्हाण, महेश उर्फ उमेश काळे, भैय्या काळे व लाकर काळे यांचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी तीन साथीदार फरार असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी आरोपींकडून ६९ ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे असा एकूण १० लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे या टोळीने जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, सोनई आदी भागांत एकूण १० गंभीर गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे.

स्वतःच्या घरी न थांबता ओळखीच्या लोकांकडे आश्रय

ही टोळी गुन्हा केल्यानंतर स्वतःच्या घरी न थांबता ओळखीच्या लोकांकडे आश्रय घेत असल्याने पोलिसांना शोध घेणे कठीण जात होते. दरम्यान, आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी एका व्यक्तीलाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार, सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहिद शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, चालक महादेव भांड, भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.