Robbery : संगमनेर: गेल्या अनेक दिवसापासून संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या चोऱ्यांचा तपास लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. त्यांच्या या शोध मोहिमेला शुक्रवारी (ता. १७) रात्री अकराच्या सुमारास ११२ क्रमांकावर आलेल्या फोन कॉलमुळे यश आले. दरोड्याच्या (Robbery) तयारीत असलेल्या नऊ जणांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, त्यातील एक आरोपी (Accused) अल्पवयीन आहे. ही टोळी संगमनेर व राहाता तालुक्यातील विविध गावातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नक्की वाचा: सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की (Robbery)
याबाबत आश्वी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पठार भागातील साकुर व पारनेरला जोडणाऱ्या पानोडी- वरवंडी या दरम्यानच्या घाट रस्त्यावर मालवाहतुकीचा टेम्पो व त्यासोबत सुमारे नऊ इसम रस्त्याच्या कडेला गुन्हा करण्याच्या इराद्याने दबा धरून बसल्याची माहिती वरवंडी येथील नितीन बाळासाहेब गायकवाड यांनी दिली. पोलिसांनी तातडीने या माहितीची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळ गाठले असता, त्यांना ही माहिती सत्य असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी हालचाली करून तेथे आढळलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील आकाश सुनील पाळंदे, रोहित भिरू मुळेकर व एक अल्पवयीन आरोपी (सर्व रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) यांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्यासोबत सिद्धू मकवाने (रा. दाढ बुद्रुक, ता.राहाता) कदिर ( पूर्ण नाव माहित नाही) (रा.घुलेवाडी, ता. संगमनेर) व शरद हरिभाऊ पर्वत (रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) व इतर तीन अज्ञात असे एकूण नऊ आरोपी या टोळीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.
हे देखील वाचा: मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल
दरोडा टाकण्याच्या तयारीत (Robbery)
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे चार लाख रुपये किमतीचा मालवाहतुकीचा टेम्पो, लोखंडी कटावणी, कटर, कुऱ्हाड, लाकडी दांडे, लोखंडी रॉड, दोरी व मिरची पावडर असे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पानो डी घाट रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणारे वाटसरू यांची लुटमार तसेच दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.
याप्रकरणी इतर सहा आरोपी निष्पन्न झाले असून, ते फरार झाले आहेत. सहायक फौजदार बाबासाहेब पाटोळे यांनी आश्र्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.