Robbery : श्रीरामपूर : तालुक्यातील उंबरगाव येथे दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. पथकाने जेरबंद आरोपींकडून चार लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्वरुप डिस्चार्ज काळे (वय २४), दऱ्या बरांड्या भोसले (वय २५), आजब्या महादू भोसले (वय २९, सर्व रा. अंतापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) व कुलत्या बंडू भोसले (वय २३, रा. बाबरगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजी नगर) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.
नक्की वाचा: लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई
पाठलाग करून चार आरोपींना घेतले ताब्यात
जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे सराईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली की, स्वरुप डिस्चार्ज काळे व त्याचे पाच ते सहा साथीदार दोन दुचारीवरून बेलापूर ते पढेगाव रस्त्यावर काळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ अंधारामध्ये थांबले आहेत. ते कोठे तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. या माहितीनुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तेथे छापा टाकण्यासाठी पाठविले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. मात्र, त्याच वेळी आरोपींना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पथकाने आरोपींचा पाठलाग करून चार आरोपींना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत रवींद्र मुबारक भोसले व सोहेल पठाण (दोघे रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) दोघे पसार झाले.
अवश्य वाचा: आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज, पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित
चार लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Robbery)
पथकाने जेरबंद आरोपींची झाडाझडती घेतली, त्यावेळी आरोपींकडे ७० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची बोरमाळ, ७० हजार रुपये किमतीचे लॉकेट, ४२ हजार रुपये किमतीची ६ ग्रॅम वजनाची नथ, ३५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची अंगठी, एक लाख ६० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, एक तलवार, एक पिस्तुल, एक कटावणी, एक चाकू, मिरचीपूड असा चार लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. या टोळीला जेरबंद केल्याने दोन नेवासा व श्रीरामपूर येथील दरोड्याच्या घटनेची उकल झाली. जेरबंद चारही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यातील कुलत्या भोसलेवर यापूर्वी १५, स्वरुप काळेवर १८, दऱ्या भोसलेवर तीन तर आजब्या भोसलेवर तीन गुन्हे दाखल आहेत. पथकाने पुढील तपासासाठी आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.