Rohit Pawar : नगर : “दोन दिवस थांबा, फार मोठा स्फोट आहे. त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की, पाच हजार कोटींपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे. त्याबाबतीत सविस्तर ट्विट (Tweet) मी नक्कीच करेन. जो खुलासा (Disclosure) मी करणार आहे. त्यामध्ये विविध खाते आहेत. त्या विविध खात्यांचे…दोन दिवस थांबा”, असं सूचक विधान रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज केलं.
नक्की वाचा : ‘मनोज जरांगेंचा अभ्यास कमी,मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण’- छगन भूजबळ
दोन दिवसांत मोठा खुलासा करणार
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आतापासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. अशातच लवकरच राज्याचे पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत ‘राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा दोन दिवसांत करणार आहे’, असल्याचं म्हटलं. तसेच ‘दोन दिवस थांबा फार मोठा स्फोट आहे’, असं सूचक विधानही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
अवश्य वाचा : गुडन्यूज! जूनमधील मान्सून आता जुलैमध्ये बरसणार
रोहित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली (Rohit Pawar)
“आम्ही आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांना भेटण्याचं कारण म्हणजे काही विषय माझ्या मतदारसंघातील होते. तसेच काही विषय हे महाराष्ट्राच्या हिताचे होते. केंद्र सरकारने जो पेपर फुटीसंदर्भात कायदा केला. तो कायदा राज्यात यावा, यासाठी आम्ही सर्वजण अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. उत्तराखंडमधील राज्यपालांनी स्वत:हून पुढाकार घेत तसा कायदा केला. त्यामुळे आता या अधिवेशनामध्ये राज्यपालांनी पुढाकार घेऊन राज्य सरकारला यासंदर्भातील आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांना केली”, असं रोहित पवार म्हणाले.