Rohit Pawar : कर्जत: पाटेगाव-खंडाळा कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच जुलैअखेर एमआयडीसीला (MIDC) मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदार रोहित पवार यांना दिला. एमआयडीसीसाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार पवार यांनी सुरु असलेले उपोषण मागे घेतले.
अवश्य वाचा : आरक्षणाचे खरे शत्रू काेण?; शरद पवारांचे नाव न घेता मंत्री विखेंची टीका
राजकीय दबावामुळे अधिसूचना काढली जात नसल्याचा आरोप
कर्जत-जामखेड मतदारसंघातील मौजे पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार पाठपुरावा करत आहेत. एमआयडीसीला तत्वतः मान्यता, जागा पाहणी, ड्रोन सर्व्हे, व्यवहार्यता अहवाल, तांत्रिक समितीची मान्यता आदी टप्पे पूर्ण केले आहे. एमआयडीसीची फाईल अंतिम अधिसूचनेसाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या फाईलवरची धूळ देखील झटकली गेली नाही. माजी मंत्री आणि विधानपरिषदेतील आमदार राम शिंदे यांच्या राजकीय दबावामुळे एमआयडीसीची अधिसूचना काढली जात नसल्याचा आरोप आमदार पवार आपल्या भाषणात कायम करतात.
नक्की वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी
कार्यवाही न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा (Rohit Pawar)
आपल्या अस्तित्वाची एमआयडीसी मंजूर करण्यासाठी त्यांनी गेल्या चार ते पाच अधिवेशनात वेगवेगळ्या संसदीय आयुधांच्या माध्यमातून सातत्याने याबाबत आवाज उठवला. मागील वर्षी विधिमंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भर पावसात त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र ते आश्वासनच राहिले. नुकतेच पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. तसेच उचित कार्यवाही न झाल्यास कर्जत एमआयडीसी प्रश्नसाठी पुन्हा विविधमंडळाच्या आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. मात्र, यावर काहीही तोडगा न निघाल्याने गुरुवारी (ता.११) विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषण सुरू केले. यावर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना बोलावून घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह चर्चा करीत कर्जत-जामखेडची एमआयडीसी प्रलंबित फाईल जुलै अखेरपर्यंत मंजूर करण्याचा शब्द दिला.