Rohit Pawar : कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार (State Government) यांच्या चुकीच्या धोरणावर कायम आपल्या सोशल मीडियावरून आवाज उठविताना दिसत असून त्यांनी प्रखर विरोधक म्हणून आपली राजकीय प्रतिमा सध्या बनवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून राज्य सरकारचे इतर मंत्री चुकले की आमदार पवार त्यांना चांगलेच शाब्दिक फटकारे देत सर्वसामान्य जनतेच्या हितावह बोलताना निदर्शनास येत आहे. राज्यात सध्या चांगल्या-चांगल्या मातब्बर नेत्यांनी भाजप (BJP) सरकारच्या विरोधात मिठाची गुळणी घेतली असताना त्यांच्या या निर्भीड वक्तव्याने आगामी काळात एनडीए आणि महायुती सरकारचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून आपली प्रतिमा पुढे आणण्यात यशस्वी ठरत आहे.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
मंत्र्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा घेतात खरपूस समाचार (Rohit Pawar)
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून कायम राजकीय क्षेत्रात चर्चेत असतात. स्वतः त्यांचे काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा आपल्या भाषणात रोहित पवार यांच्या सोशल मीडियावर “खूप बोलतो” म्हणून त्यांच्या सक्रिय असलेल्याचा उल्लेख करतात. आमदार रोहित पवार आपल्या सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा मोजके केंद्रीय मंत्र्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्र्यांनी काही चुकीचे भाष्य, निर्णय अथवा सर्वसामान्य जनतेच्या विरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास त्याचा खरपूस समाचार घेताना दिसतात. विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेस, शिवसेना उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे इतर नेते कायम शांत बसले असताना रोहित पवार मात्र यास अपवाद ठरत आहे. त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या चुकीच्या निर्णया विरोधात आपली आक्रमक भूमिका एखाद्या विरोधी पक्षनेत्यास लाजवेल अशी प्रतिमा या माध्यमातून पुढे आणली आहे. आपल्या सोशल मीडियावर असो किंवा पत्रकार परिषद असो रोहित पवार सरकारला धारेवर धरताना आक्रमक शैलीद्वारे भविष्यातील एक कणखर राजकीय विरोधी नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात गणले जाऊ लागले आहे.

नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
उत्तम राजकीय विरोधक प्रतिमा उभारण्यात यशस्वी (Rohit Pawar)
मतदारसंघात देखील आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा राजकीय टोकाचा संघर्ष महाराष्ट्रास सर्वश्रुत आहे. शिंदे-पवार दोन्ही जाणकार लोकप्रतिनिधी एकमेकांच्या चुकांवर भाष्य करून आपली राजकीय भूमिका जनतेसमोर मांडताना कधी-कधी खालची पातळी देखील ओलांडतात. राम शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याचा फायदा त्यांना राजकारणात दोनदा मिळाला. २०१९ ला विधानसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना मिळाली विधान परिषदेची आमदारकी असो किंवा २०२४ ला पुन्हा एकदा अल्पमतानी मिळालेल्या पराभव झाला असताना देखील विधान परिषदेचे सभापती विराजमान केले. त्यामुळे रोहित पवार यांची देखील राजकीय महत्वकांक्षा वाढली असून आगामी काळात राजकीय पातळीवर चमकायचे असेल तर कट्टर विरोधक म्हणून भूमिका बजावल्यास त्याचा फायदा नक्की मिळेल म्हणून सध्या राज्यात उत्तम राजकीय विरोधक म्हणून आपली प्रतिमा उभारण्यात यशस्वी ठरत आहे.
काका अजित पवारांना देखील आमदार रोहित पवार टीकेचे लक्ष्य बनवतात
आमदार रोहित पवार आपल्या सोशल मीडियावर कायम सरकारला लक्ष्य करीत आक्रमक शैलीत खडे बोल सुनावताना निदर्शनास येतात. ज्या काकांनी आमदार पवार यांना २०१९ साली कर्जत-जामखेड मतदारसंघ बहाल केला. त्या काकांच्या विरोधात देखील रोहित पवार सोशल मीडियावर टीकेचे लक्ष्य बनवत राळ उडवत असतात. त्यामुळे एक उत्तम राजकीय विरोधक म्हणून अल्पकाळातच त्यांची प्रतिमा उदयास आली आहे.



