S.T. Bus | पाथर्डी : पाथर्डीच्या (Pathardi) एस.टी. बस (S.T. Bus) आगारात पुन्हा एकदा चालकांना जबरदस्तीने थेट पाथर्डी–मुंबई कामगिरी करण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचा धाक दाखवला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत पाथर्डी–मुंबई थेट कामगिरी एकाच चालकावर दिल्यामुळे दोन गंभीर अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये एका निष्पाप चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
हे वाचा – पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; १९ जणांचा मृत्यू
अपघातात त्यांचे निधन (S.T. Bus)
स्वर्गीय सतीश वारे हे पाथर्डीहून मुंबई कामगिरी करत असताना भीमा कोरेगाव येथे अपघातात त्यांचे निधन झाले. हा अपघात संपूर्ण एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक होता. या घटनेनंतर प्रशासनाने काही काळासाठी पाथर्डी–मुंबई थेट कामगिरी बंद करून तारकपूर आगारातून बदली चालक (स्क्रू चालक) देण्याची व्यवस्था सुरू केली होती.मात्र आता पुन्हा एकदा प्रशासनाने तीच चूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अवश्य वाचा- १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली!
कामगिरी लादली (S.T. Bus)
रातराणी बससाठी चालकाची ड्युटी किती तासांची असते, किती किलोमीटरची असते, याचे कोणतेही भान न ठेवता चालकांवर थेट मुंबई कामगिरी लादली जात आहे. ही बाब केवळ नियमबाह्यच नाही तर प्रवाशांच्या तसेच चालक–वाहकांच्या जीवाशी थेट खेळणारी आहे. या गंभीर प्रश्नावर विचारणा केली असता, प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत असे सांगून जबाबदारी झटकली जाते. मात्र, जर पुन्हा एखादा अपघात घडला, कोणाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न आज प्रत्येक चालक, वाहक आणि प्रवासी विचारत आहे.
कोणताही धडा घेतलेला दिसत नाही (S.T. Bus)
एस.टी. महामंडळाने यापूर्वी झालेल्या अपघातांमधून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. नियम, सुरक्षितता आणि मानवी जीवन यापेक्षा वरिष्ठांचे आदेश मोठे मानले जात असतील, तर भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाने तात्काळ पाथर्डी–मुंबई थेट कामगिरीसाठी बदली चालक देण्याची व्यवस्था कायमस्वरूपी करावी.रातराणी ड्युटीचे तास व किलोमीटरचे नियम काटेकोरपणे पाळावेत.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही अपघातास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, हे स्पष्ट आहे.



