Sachin Kurmi Case : भायखळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी (Sachin Kurmi) यांची ऑक्टोबर २०२४ मध्ये हत्या (Murder) झाली होती. या प्रकरणात १६ आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली. मात्र, या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असून त्याला अटक झालेली नाही,असा आरोप सचिन कुर्मी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
मुख्य आरोपीला अटक न झाल्यास १ मे पासून उपोषणाला बसण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सचिन कुर्मी यांच्या कुटुंबीयांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आता या हत्येमागे मंत्री आशिष शेलार, यशवंत जाधवांच्या कार्यकर्त्याचा हात असल्याचा गंभीर आरोप (Blame) सचिन कुर्मी यांच्या भावाने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं ?(Sachin Kurmi Case)
भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय सचिन कुर्मी यांची ४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. सचिन कुर्मी हे भायखळ्यातील म्हाडा कॉलनी येथे गेले असताना, काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले,तेव्हा कुर्मी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिसांनी त्यांना तत्काळ आपल्या गाडीतून जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणात एकूण १६ आरोपी असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.
कुटुंबीयांचं म्हणणं काय ?(Sachin Kurmi Case)
सचिन कुर्मी यांच्या हत्येला सहा महिने उलटले तरी देखील अजूनही मुख्य आरोपीला अटक झाली नाही. त्यामुळे सचिन कुर्मी यांच्या कुटुंबाने उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. याबाबत बोलताना कुर्मी कुटुंबाने गंभीर आरोप केले असून सचिन कुर्मी यांच्या हत्येमागे मंत्री आशिष शेलार आणि यशवंत जाधव यांचा हात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. आशिष शेलार यांचा जवळचा कार्यकर्ता बुवा कुलकर्णी आणि त्याच्या साथीदारांनी सचिन कुर्मीची हत्या केली. पोलिसांना याबाबत माहिती आहे. तरीदेखील कोणतीच हालचाल पोलिसांकडून होत नाही,असं कुर्मी कुटुंबाचं म्हणणं आहे.