Sahebrao Ghadge Patil : नगर: नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे (Trimurti Pawan Pratishthan) संस्थापक अध्यक्ष तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील (Sahebrao Ghadge Patil) यांचे काल मुंबई येथे निधन झाले. घाडगे पाटील यांच्या पार्थिवावर आज सकाळी नेवासा फाटा (Newasa Fata) येथील त्रिमूर्ती संकुलात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा : ‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा
सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहचवण्याचे कार्य
साहेबराव घाडगे पाटील यांनी शासनाच्या राज्य परिवहन महामंडळ, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, लोणी, भारतीय सैन्यदल, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त आदी प्रशासकीय पदांवर काम केले आहे. उच्च पदावर काम करत असताना त्यांना आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी समाजातील मुलांमुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था करावी, ही तळमळ होती. म्हणूनच त्यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची 24 नोव्हेंबर 1995 मध्ये स्थापना केली. त्यांनी तेलकुडगाव, ढोरजळगाव, शेवगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, धामणगाव रेल्वे अमरावती या ठिकाणी सर्व सोई सुविधायुक्त शैक्षणिक संकुल उभारली आहेत. साहेबरावजी घाडगे यांचा हा प्रवास अतिशय खडतर व प्रेरणादायी असा आहे, अगदी शुन्यातून सुरुवात करुन त्यांनी सर्वोच्च ध्येय गाठले. तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवण्याचे पवित्र कार्य त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत यशस्वीपणे केले.
अवश्य वाचा : ‘दिवा विझताना मोठा होतो,तसं जयंत पाटलांचं झालंय’- गोपीचंद पडळकर
मुंबई येथे घेतला अखेरचा श्वास (Sahebrao Ghadge Patil)
तेलकुडगाव येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या घाडगे पाटील यांनी माध्यमिक शिक्षण ढोरजळगाव येथे घेतले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी ‘कमवा आणि शिका’ मधून बोरावके महाविद्यालयात बी. एस्सी शिक्षण घेतले होते. अहिल्यानगरला ए. एस्सी व पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये डिआयआयटी या पोस्ट ग्रॅज्युएटची पदवी घेतली. सातारा महाविद्यालयात एक वर्ष अधिव्याख्याता म्हणून त्यांनी नोकरीची सुरुवात केल्यानंतर सलग बावीस वर्षे त्यांनी प्रवरा महाविद्यालय, भारतीय सैन्यदल, एसटी महामंडळात सेवा केली. मुंबई महानगरपालिकेत त्यांनी उप व सहआयुक्त म्हणून आठ वर्षे सेवा दिली.
त्यांना शिक्षण घेताना आलेल्या अडचणी ग्रामीण भागातील इतर मुलांना येऊ नये याकरिता साहेबराव घाडगे पाटील यांनी १९९५ साली त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची स्थापना करून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. तेलकुडगाव या जन्मभूमीत शिक्षण कार्याचा श्रीगणेशा केल्यानंतर त्यांनी पुढे श्रीरामपूर, नेवासे फाटा, शेवगाव, ढोरजळगाव, घोगरगाव, अहिल्यानगर, वर्धा, तसेच धामणगाव रेल्वे येथे वसतिगृहासह प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा उभी केली. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या माध्यमातून वसतिगृहासह २७ शाळा व २१ महाविद्यालये सध्या सुरू आहेत. घाडगे पाटील यांच्यामुळे ग्रामीण भागातील २५ हजारांहून अधिक मुलांना शिक्षणाची कवाडे उघडली गेली. अनेक विद्यार्थी अल्पदरात शिक्षण घेऊन मोठ्या हुद्यांवर पोहोचलेली आहेत. अशा या तपस्वी शिक्षण महर्षींनी काल मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला.