Sairam Iyer : नगर : अनाम प्रेम संस्थेमधील (Anam Prem Sanstha) दृष्टीहीन कलावंतांमध्ये (Blind Artist) खूप टॅलेंट आहे. त्यांना विविध कलांची दैवी देणगी लाभलेली आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत केवळ सहानुभूती व्यक्त करून चालणार नाही तर त्यांना व त्यांच्या कलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक साईराम अय्यर (Sairam Iyer) यांनी केले.
नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सही; पुण्यातील रुग्णाला मिळाली मदत
अनेक मान्यवरांची उपस्थिती
येथील धनश्री म्युझिक अँड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने नंदनवन लॉन्स वर आयोजित ‘दिलसे सारेगामापा’ या संगीत मैफलित ते बोलत होते. सेवानिवृत्त मेजर अशोक कुमार सिसोदिया, इंडियन आयडॉल फेम हेमंत कुमार राठोड, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, ॲड. सुभाष काकडे, गायिका अंजली गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अवश्य वाचा : टंचाईग्रस्त नागलवाडीत पाणीच पाणी; जलयुक्त शिवारने केली किमया
दृष्टीहीन गायक गायिका यांना व्यासपीठ उपलब्ध (Sairam Iyer)
हेमंत कुमार राठोड यांच्या पुढाकारातून स्नेहालय संचलित अनामप्रेम मधील दृष्टीहीन गायक गायिका यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘दिलसे सारेगामापा’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलित सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक साईराम अय्यर हे गेल्या ३ दिवसापासून अहिल्यानगर येथे आले होते. नगर मधील कलावंतांसोबतच त्यांनी या संगीतमय मैफलीत सादर होणाऱ्या गीतांची पूर्वतयारी केली व नगरी पाहुणचारही घेतला.
नंदनवन लॉन्सवर उभारण्यात आलेल्या रंगमंचावर त्यांनी बुधवारी (ता. ४) रात्री ९ वाजता श्रोत्यांच्या गर्दीतून गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ हे गीत सादर करीत त्यांचे आगमन झाले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
त्यांच्या या सादरीकरणामुळे उपस्थित श्रोते आश्चर्यचकित झाले. भारताच्या गान कोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या हुबेहूब आवाजात गाणे सादर करणारे गायक म्हणून ते केवळ भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे जगातील आठवे आश्चर्य म्हणून पाहिले जाते. त्यांनी या मैफलित तुम मिले दिल खिले l और जीने को क्या चाहिये, ये राते, ये मौसम, नदी का किनारा l चंचल हवाये l पहेला नशा, पहेला खुमार, हम पे किसी ने हरा रंग डाला l खुशी ने हमे मार डाला l अशी बहारदार गीते सादर केली.
एका कलंदर दृष्टिहीन कलावंताने एका हाताने टाळी वाजवत, तबल्याचे विविध बोल, कव्वालीवर आधारित संगीत तसेच ओंकार स्वरूपा या गाण्यालाही केवळ आपल्या हाताचा वापर करून संगीत दिले. त्याच्या या अनोख्या कलेमुळे श्रोते अचंबित झाले.
इंडियन आयडॉल फेम हेमंत कुमार राठोड यांनी लगन लगी तुमसे, नुसरत फतेह अली खान यांची गाजलेली कव्वाली, तू ही रे अशी रोमँटिक गाणी सादर केली. तर अंजली गायकवाड यांनी भोर भई पलघट पे, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, अधीर मन झाले आणि वाजले की बारा ही गाणी सादर केली.
नगरचे कुमार सानू म्हणून परिचित असणारे डॉ. दमन काशीद यांनी ‘दिल, जिगर, नजर क्या है’ हे बहारदार गीत सादर केले. तर सुनील देठे यांनी ‘या अली’, ‘खेळ मांडला’ ही गाणी सादर केली. प्रशांत त्रिभुवन यांनी माऊथ ऑर्गनवर ये दोस्ती हम नही छोडेंगे हे गीत सादर केले. तर सुदर्शन राव यांनी सेक्सोफोन वादन केले.
या कलावंतांना ॲडमिन, संजय आठवले, संकेत देहाडे, अजित अमर (गिटार), प्रशांत त्रिभुवन, चाणक्य देवचक्के (ड्रम सेट), सोनू साळवे (ढोलक), कुमार साळवे (रिदम मशीन), जॉय जाधव (तबला) यांनी सुरेल संगीत साथ दिली. रेडिओ सिटी चे आर.जे. प्रसन्ना यांनी या संगीत मैफलीचे बहारदार सूत्रसंचालन केले. या संगीत मैफलीस नगर शहरातील संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.