Sajan Pachpute : श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीच्या आगोदर झालेल्या आंदोलनात जनतेविषयी कळवळा असल्याचे दाखवत स्टंट करून पथकर नाका बंद करणाऱ्या विक्रम पाचपुते यांनी आमदार होताच टक्केवारी ठरवत पथकर नाका चालू केला आहे, असा आरोप शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते (Sajan Pachpute) यांनी आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांच्यावर केला. नगर-दौंड महामार्गावरील रस्त्याचे काम अपूर्ण असताना निमगाव खलू येथील पथकर नाक्यावर स्थानिकांनी टोल माफीची मागणी करीत शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांनी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या उपस्थितीत आक्रमक भूमिका घेतली.
अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया
स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येवून भर पावसात केले आंदोलन
टोलवसुली बंद करण्यासाठी आज (ता.२३) शिवसेना, मित्रपक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येवून भर पावसात आंदोलन केले. एकत्र बैठक घेऊन पुढील निर्णय होई पर्यंत पथकर नाका बंद करण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने खासदार निलेश लंके यांनी रस्ते महामार्गाचे अधिकारी फैलावर घेतले.
नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे
साजन पाचपुते म्हणाले, (Sajan Pachpute)
विधानसभा निवडणूक होण्याच्या अगोदर ज्या मुद्द्यावर पथकर नाका बंद केला होता ते मुद्दे अद्याप जैसे थे असताना पथकर नाका सुरू केला. या आगोदर ज्यांनी पथकर नाका बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते तेच आता सुरू असलेल्या पथकर नाक्यावरील वसुलीत सहभागी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
नगर-दौंड महामार्गावरील लोणी व्यंकनाथ येथील उड्डाण पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्त्याचे काम ठिकठिकाणी अपूर्ण असताना महामार्गावरील निमगाव खलू येथील पथकर नाका प्रशासनाने सुरू केला. यात काही स्थानिक नागरिकांना सूट असल्याचे सांगत त्यांच्या फास्टॅग मधून पैसे कट होत असल्याने टोलचा भुर्दंड सुरू झाला. टोलनाक्यावर परप्रांतीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कर्मचारी असल्याने स्थानिक तसेच इतर वाहन चालकांसोबत अरेरावीची भाषा करत मारामारी करत असल्याची तक्रार केली. यावेळी राजेंद्र नागवडे, ऋषिकेश भोयटे, डॉ. अनिल कोकाटे, वागंदरी सरपंच संजय नागवडे, नारायण टिमुणे, शिवसेना शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, गोकुळ फराटे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम पाचपुते, किरण कुरुमकर यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली.
अहिल्यानगर येथील रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने आंदोलक संतप्त झाले होते. महामार्गवर दोन्ही बाजूने लांब पर्यंत वाहनाची रांग लागल्याने पोलिसांनी गाड्या सोडण्यासाठी विनंती करताच आंदोलक आणि पोलिस यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. आंदोलक आक्रमक होत पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला. प्रश्नांचा भडिमार होताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत पथकर नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी कोणतेही कागदपत्रे रस्ते महामार्ग विभागाकडून आलेले नसल्याचे त्यांचे व्हेरिफिकेशन झाले नसल्याचे कबूल केले.
यावेळी खासदार लंके यांच्याशी रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी फोन वर बोलत एकत्र बैठक घेऊन पुढील निर्णय होईपर्यंत पथकर नाका बंद करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी महसूल प्रशासनाकडून निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, संतोष भंडारे उपस्थित होते. तर आंदोलनामध्ये जितेंद्र मगर, सुधीर नलगे, डॉ.अनिल कोकाटे, सुभान तांबोळी, सचिन कोकाटे, रमेश गिरमकर, विजय शेंडे, जहीर जकाते, श्रीकांत मगर, चिमणराव बारहाते, धनंजय पंडित, पपू दांगट, अतुल पाचपुते, यांच्या सह परिसरातील नागरिक, वाहनचालक, मालक मोठ्या संख्येने हजर होते.