Sangamaner Municipality : संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या (Sangamaner Municipality) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. एकीकडे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व तांबे कुटुंबाचा पारंपरिक प्रभाव तर दुसरीकडे नव्याने उदयास आलेले आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) आणि त्यांच्या पाठीशी असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा मजबूत पाठिंबा अशी थेट दोन पिढ्यांची राजकीय लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
पकड मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू
आमदार अमोल खताळ हे सामान्य कुटुंबातून आलेले व तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणारे चेहरे असल्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी खताळ यांनी घेतलेली तळागाळातील मेहनत, मंत्री विखे यांचा थेट पाठिंबा आणि स्थानिक पातळीवरील वाढती नाराजी या सर्वांचा परिणाम थोरात गटावर झाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, याच वेळी थोरात – तांबे गटाने पुन्हा एकदा शहरात आपली पकड मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अवश्य वाचा : तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजऱ्यात टाका; मुलांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी
तांबे कुटुंबातील महिलेला उमेदवारी मिळण्य़ाची शक्यता (Sangamaner Municipality)
महायुतीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजून निश्चित झाला नसला, तरी शहर विकास आघाडीकडून तांबे कुटुंबातील एका महिलेला उमेदवारी मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तांबे कुटुंबाला पालिकेतील दीर्घ अनुभव, माजी मंत्री थोरात यांचे जाळे आणि कार्यकर्त्यांचा मजबूत आधार असल्याने त्यांचे पारडं सध्या जड दिसत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, जातीय आणि सामाजिक समीकरणांचाही विचार केला तर नगराध्यक्षपदाचा कल काँग्रेसकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु, खताळ गटाची वाढती लोकप्रियता, तरुणांचे आकर्षण आणि विरोधकांची एकजूट या गोष्टी काँग्रेसच्या स्थिर गडात धक्का निर्माण करू शकतात.
संगमनेर नगरपालिका दशकांपासून काँग्रेसकडे आहे. मात्र, शहराच्या विकासाबाबत अनेक गंभीर प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत. शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय अवस्थेत असून, धूळ व अस्वच्छतेने नागरिक त्रस्त आहेत. याआधीही महिला नगराध्यक्षा होत्या, तरीही शहरात अनेक ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहेच नाहीत. ई-टॉयलेट संगमनेरात आले खरी, पण ती धुळखात पडल्याचं वास्तव आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांना कुलूपबंद अवस्था असून, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तसेच शहरातील वाढते अतिक्रमण, अवैध धंदे आणि कत्तलखाने याबाबत पालिकेचा निष्क्रियपणा नागरिकांच्या नाराजीचं कारण बनला आहे.
झाडांची लागवड विजेच्या तारेखाली केल्यामुळे वारंवार वीज खंडित करून छाटणी केली जाते, यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाहतूक कोंडी, सिग्नल यंत्रणेचा अभाव आणि अव्यवस्थित बाजारपेठ या समस्याही दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. तांबे–थोरात गटाची परंपरा आणि संघटनशक्ती एकीकडे, तर खताळ–विखे यांची नव्या पिढीतील लोकप्रियता आणि कार्यशैली दुसरीकडे अशा दोन टोकांची लढत संगमनेरमध्ये रंगणार आहे. आता मतदार राजा कुणाच्या पारड्यात सत्ता देतो, पारंपरिक गड राखला जातो की नवा इतिहास घडतो, हे येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होणार आहे. मात्र एक निश्चित — संगमनेर नगरपालिकेची ही निवडणूक यंदा केवळ राजकीय नव्हे, तर प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.



